येवला येथे घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी धरणे
By Admin | Updated: February 6, 2016 22:23 IST2016-02-06T22:20:24+5:302016-02-06T22:23:37+5:30
येवला येथे घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी धरणे

येवला येथे घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी धरणे
येवला : नगर परिषदेने अवास्तव व अन्यायकारक पद्धतीने आकारण्यात आलेली चतुर्थ वार्षिक एकत्रित कर घरपट्टीवाढ कमी करावी या मागणीसाठी येवला शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पालिकेवर दोन तास धरणे धरले, घरपट्टी रद्द झालीच पाहिजे अशा आशयाच्या घोषणा दिल्या.
गावठाण बाहेरील मिळकतीसाठी भाडे अंदाजावर २५ टक्के वाढ करून गावठाणातील मिळकतीवर घरगुती वापरासाठी ४० टक्के वाढ व वाणिज्य वापरासाठी ६० टक्के वाढ केलेली आहे. मनमाड नगर परिषदेची अंतिम चतुर्थ वार्षिक कर आकारणी नुकतीच झालेली असून, त्यांनी फक्त भाडे अंदाजावर आठ टक्के वाढ केली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे येवले नगर परिषदेने केलेली घरपट्टीवाढ ही अवास्तव, अवाजवी व येवलेकर जनतेवर अन्याय करणारी आहे. यानंतर शहरवासीयांना पालिकेने आकारलेल्या घरपट्टीच्या ३० टक्के रक्कम भरून अपिलीय समितीपुढे अपील दाखल करता येणार आहे. अपिलीय पाच सदस्यीय समितीत जिल्हाधिकारी प्रतिनिधी अर्थात प्रांताधिकारी, नगररचना विभागाचे प्रतिनिधी, नगराध्यक्ष, महिला बालकल्याण समिती सभापती व विरोधी पक्षनेता यांचा समावेश असणार आहे. त्यावेळी नगराध्यक्ष व समितीतील नगरपालिका सदस्य यांनी जनतेची बाजू घेऊन दुष्काळाचा विचार करता अवास्तव केलेली वाढ कमी करून जनतेला दिलासा द्यावा. तसेच कामकाजाच्या दृष्टिकोनातून मार्चपर्यंत वसुली करणे अनुदानाच्या दृष्टीने गरजेचे असल्याने सध्याची आकारणी करून तसेच मागील वर्षाचा फरक वसूल करण्यास येवलेकर मदतच करतील, फक्त कमी होणारी रक्कम ही पुढील वर्षासाठी आगाऊ जमा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनात केली आहे.
येवला पालिकेने गेल्या दोन वर्षात सहा महिन्यांच्या अंतराने घरपट्टीवाढ कर आकारणी संबंधात तीन ठराव केले आहेत. या ठरावात घरपट्टी कर आकारणीसंदर्भात संभ्रम निर्माण करणारा असल्याने सदर घरपट्टी कमी करणे गरजेचे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सदर भरमसाठ अन्यायकारक घरपट्टीवाढीबाबत जनतेत पालिकेच्या विरोधात असंतोष पसरला आहे. यामुळे नगराध्यक्ष, नगरसेवक, विरोधीपक्ष नेते यांनी अपिलीय समितीसमोर जनतेची बाजू मांडावी व घरपट्टी कमी करून दिलासा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी याविरोधात मोठे व उग्र स्वरूपाचे आंदोलन उभे करून होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा उभा करेल, असा इशारा दिला आहे.
या आंदोलनात भाजपा नेते श्रीकांत गायकवाड, प्रमोद सस्कर, मीननाथ पवार, गीताराम दारूणकर, राधेश्याम परदेशी, राजेंद्र काबरा, गणेश खाळेकर, संजय करंजकर, दुर्गा भांडगे, लीलाबाई पेटकर, रत्ना गवळी, युवराज पाटोळे, तरंग गुजराथी,
संकेत वाडेकर, सुमित खानापुरे, देवेंद्र मोहरे, राजेश सोनवणे, अरुण काथवटे, संजय खानापुरे, सुनील काटके यांच्यासह सुमारे १०० कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर)