कोलती नदीत किटकनाशक फवारणीची मागणी
By Admin | Updated: November 12, 2014 23:41 IST2014-11-12T23:40:46+5:302014-11-12T23:41:06+5:30
कोलती नदीत किटकनाशक फवारणीची मागणी

कोलती नदीत किटकनाशक फवारणीची मागणी
देवळा : येथील कोलती नदीपात्रातील घाण कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव झालेला आहे. यामुळे परिसरात डेंग्यू, मलेरिया आदि आजारांचा फैलाव होऊ शकतो. ह्या नदीपात्राची स्वच्छता करावी व किटकनाशकांची फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांनी देवळा ग्रामपालिकेच्या सरपंचाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोलती नदीवर आदर्श हॉस्पिटलच्या पाठीमागे नुकताच एक केटीवेअर बंधारा बांधण्यात आला आहे. ह्या बंधाऱ्यातील पाणी आटल्यानंतर सदर बंधाऱ्यात घाण कचरा मोठ्या प्रमाणात साठला असून, पाण्याची डबकी निर्माण झाली आहेत. यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून, डासांचे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
निवेदनावर असलम तांबोळी, शकील तांबोळी, शरीफ तांबोळी, अल्ताफ तांबोळी, लियाकत शेख, शब्बीर शेख, सिकंदर शहा, मनोज पगार, दिनेश गुरव, संजय निकम, नामदेव भामरे, दिगंबर शिंदे, श्याम चव्हाण आदिंसह तीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोलती नदीपात्रात ठिकठिकाणी पाणी साचलेले असून, चिखल झालेला आहे. यामुळे स्वच्छतेच्या कामात अडचणी येत आहेत. पाण्यावर आॅईल टाकले असून, गप्पी मासे पाण्यात सोडलेले आहेत.
पुलावर बसणाऱ्या भाजीपाला विक्रेत्यांना नदीत घाण न टाकण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. उद्यापासून शहरात धूरळणी यंत्राच्या सहाय्याने डास निर्मूलन मोहीम राबविण्यात येणार असून, नदीपात्राच्या स्वच्छतेला लवकरच सुरुवात करण्यात येणार आहे. (वार्ताहर)