येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत असलेल्या पाटोदा उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करण्याची मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.पाटोदा येथील उपबाजार आवार सुरू होवून सुमारे दहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. या दरम्यानच्या काळात उपबाजार आवारात अनेक विकासकामे मार्गी लागून भुसार मालाचे लिलाव सुरू झाले आहेत. मका व्यापारासाठी पाटोदा हे महत्वाचे केंद्र तयार होत असून मका व भुसार मालाच्या लिलावात भाग घेण्यासाठी लासलगाव, येवला येथील अनेक व्यापारी येत आहेत. त्यामुळे शेतक-यांच्या मालालाही योग्य भाव मिळून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्नातही भर पडत आहे. लासलगाव व येवला कृषी उत्पन्न बाजार समिती सारख्याच अंतरावर असल्याने शेतक-यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. कांद्याच्या ऐन हंगामामध्ये येवला व लासलगाव मार्केटला मोठी गर्दी असते. त्यामुळे अनेकदा शेतक-यांना मुक्कामी रहावे लागते. पाटोदा येथील उपबाजार आवार सुरू केल्यास लासलगाव व येवला येथील बाजार समितीवरील ताण कमी होऊन लिलाव प्रक्रि या सुरळीत होण्यास मदत होईल. पाटोदा हे आजूबाजूच्या सुमारे २० ते २५ गावांची बाजारपेठ असल्याने परिसरातील कातरणी, विखरणी, आडगाव रेपाळ, मुरमी, पिंपरी, ठाणगाव, कानडी, गुजरखेडे, धनकवाडी, पिंपळगाव लेप, सोमठाण देश, लौकी शिरसगाव, दहेगाव सह परीसरातील अनेक गावांना याचा लाभ होणार आहे. याशिवाय, अनेक बेरोजगारांच्या हाताला रोजगार मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर येथील उपबाजार आवारात कांदा लिलाव सुरू करावे अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
पाटोदा येथील उपबाजारात कांदा लिलावाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 16:44 IST
शेतकऱ्यांचा आग्रह : अनेक गावांना होणार लाभ
पाटोदा येथील उपबाजारात कांदा लिलावाची मागणी
ठळक मुद्देपाटोदा येथील उपबाजार आवार सुरू केल्यास लासलगाव व येवला येथील बाजार समितीवरील ताण कमी होऊन लिलाव प्रक्रि या सुरळीत होण्यास मदत होईल.