ओढा रेल्वेस्थानकाच्या नामकरणाची मागणी
By Admin | Updated: June 25, 2015 00:20 IST2015-06-25T00:17:58+5:302015-06-25T00:20:16+5:30
ओढा रेल्वेस्थानकाच्या नामकरणाची मागणी

ओढा रेल्वेस्थानकाच्या नामकरणाची मागणी
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर कुंभमेळ्यात भाविकांचा पडणारा जादा ताण लक्षात घेता ओढा रेल्वेस्थानकाचे ‘पंचवटी रेल्वेस्थानक’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांना नगरसेवक शैलेश ढगे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभू रामचंद्रांच्या चौदा वर्षांच्या वनवासाच्या काळात त्यांचा मुक्काम नाशिक पंचवटी व आजूबाजूच्या परिसरात होता. भाविकांमध्ये नाशिक ही तपोभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. सिंहस्थ कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिकला भरत असल्याने देशातील सर्व भाविकांमध्ये नाशिकची एक वेगळी ओळख आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यात रेल्वेने लाखो भाविक शहरात दाखल होणार असल्याने नाशिकरोड रेल्वेस्थानकावर भाविकांचा मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे नाशिकरोड जवळील हाकेच्या अंतरावरील ओढा रेल्वेस्थानकावरही सिंहस्थाच्या दृष्टीने काही सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र, बहुतांश भाविक हे ओढा रेल्वेस्थानकाचा वापर करत नसल्याने त्याचा पाहिजे तसा फायदा रेल्वे प्रशासनाला होत नाही. त्यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर त्याचा मोठा भार पडतो. यामुळे ओढा रेल्वेस्थानकाचे ‘पंचवटी रेल्वेस्थानक’ असे नामकरण केल्यास परराज्यातील व इतर ठिकाणचे अनेक भाविक पंचवटी म्हणून ओढा रेल्वेस्थानकावर उतरल्यास नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील भार, ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
निवेदनावर विजय उदावंत, लालाजी पागेरे, निंबा कासार, प्रमोद प्रभुणे, निवृत्ती जुन्नरे, प्रदीप झाडीकर, पांडुरंग गायकवाड, सचिन शिंदे, नितीन जोशी, अविनाश गोसावी, चारुदत्त मुळे, बबन बागुल, एस. के. वाघ आदिंच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)