जनावरांसाठी छावणी सुरू करण्याची मागणी
By Admin | Updated: July 25, 2014 00:34 IST2014-07-24T23:42:42+5:302014-07-25T00:34:29+5:30
जनावरांसाठी छावणी सुरू करण्याची मागणी

जनावरांसाठी छावणी सुरू करण्याची मागणी
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे व परिसरात पाळीव जनावरांसाठी चारा व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी छावणी सुरू करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सुनील वारुंगसे व परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन सिन्नर तहसीलदारांना देण्यात आले आहे. परिसरात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून, यंदा चौथ्या वर्षीही त्याची पुनरावृत्ती होऊ लागल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे. चाऱ्याअभावी शेतकऱ्यांना जनावरांना बाजाराची वाट दाखविण्याची वेळ आली आहे. मात्र सिन्नर तालुक्यातच सर्वच दुष्काळी स्थिती असल्याने या जनावरांना कवडीमोल किमतीने विक्री करण्याची वेळ आली आहे. चाऱ्याअभावी पशुधन कसे वाचवायचे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. तालुक्यात दुष्काळी स्थिती असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी उपाययोजनांचा लाभ मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली आहे. शासकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याने परिसरात चारा डेपो अथवा जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या नाहीत. शासन व अधिकारीही शेतकऱ्यांप्रमाणे पावसाची आतुरने वाट पाहत आहेत. मात्र अद्याप एकही जोरदार पाऊस झाला नसल्याने दुष्काळी स्थिती बिकट झाली आहे. जनावरांअभावी परिसरातील गोठे ओस पडू लागली आहेत. सद्य:स्थितीत परिसरातील शेतकऱ्यांकडे केवळ दुभती जनावरे अर्थात गाय, म्हैस, शेळी, मेंढी एवढीच जनावरे दिसत आहेत. त्यांची संख्याही कमी झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचा जोडधंदा असलेल्या दुग्धोत्पादनावरही त्याचा परिणाम होत आहे. या जनावरांसाठी ठिकठिकाणी चारा डेपो सुरू करण्याची गरज आहे.
याबाबत शासकीय अधिकाऱ्यांनी गंभीरपणे लक्ष घालावे व जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात
आली आहे. त्यावर सुनील ढोली, अॅड. गोपाळ बर्के, प्रकाश रत्नाकर आदिंची नावे आहेत. (वार्ताहर)