‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी
By Admin | Updated: July 28, 2014 00:43 IST2014-07-27T22:55:20+5:302014-07-28T00:43:45+5:30
न्यायडोंगरी : डॉक्टरांविरुद्ध रुग्णांच्या अनेक तक्रारी

‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्याची चौकशी करण्याची मागणी
न्यायडोंगरी : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश वाघ हे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया झालेल्या
सहा रुग्णांची तपासणी न करता निघून गेल्याने रुग्णांच्या नातलगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बेजबाबदारपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. वाघ हे बऱ्याचदा कार्यालयीन वेळेत दवाखान्यात उपस्थित नसतात. तसेच मुख्यालयी राहत नाही. रुग्णांशी अरेरावी व उद्धटपणाची भाषा वापरत नेहमी रुग्णांची हेळसांड करीत असतात. दवाखान्यात बाळंतपणासाठी (प्रसूतीसाठी) आलेल्या कोमल बापू शिंदे यांना दवाखान्यात दाखल करून न घेता उडवाउडवीचे उत्तरे देऊन येथे प्रसूती होणार नाही. तुम्ही दुसरीकडे घेऊन जा, असे सांगितले. सदर महिलेने नांदगाव येथे रुग्णवाहिकाची मागणी केली असता वाहन नादुरुस्तीचे कारण देण्यात आले.
मनमानी वागणाऱ्या डॉक्टरांबाबत पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे दिलीप जाधव, विठोबा जाधव, नंदू जाधव आदिंसह ग्रामस्थांनी दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात शेवटी नमूद केले आहे. (वार्ताहर)