पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी
By Admin | Updated: September 22, 2016 00:45 IST2016-09-22T00:44:40+5:302016-09-22T00:45:00+5:30
निऱ्हाळे-फत्तेपूर : कामे होत नसल्याने ग्रामस्थांचा संताप

पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे-फत्तेपूर ग्रुप ग्रामपंचायतीत पूर्णवेळ ग्रामसेवकाची नियुक्ती करण्यात यावी अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच प्रकाश दराडे यांनी दिला आहे.
मार्चमध्ये येथील ग्रामसेवक आर. एन. ठोंबरे यांची मालेगाव तालुक्यात बदली झाली. त्यावेळी पांगरीचे ग्रामसेवक जे. एस. डहाळे यांच्याकडे निऱ्हाळे-फत्तेपूर ग्रामपंचायतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. डहाळे केवळ मासिक बैठकांनाच उपस्थित राहत होते. त्यामुळे सरपंच दराडे यांनी वारंवार पंचायत समितीत जाऊन पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी केल्यानंतर मेमध्ये अरुणा अहिरे यांची निऱ्हाळे येथे नेमणूक करण्यात आली. तथापि, त्यामुळे सरपंच दराडे यांच्यासह उपसरपंच गंगू जाधव, ग्रामपंचायत सदस्य योगेश सांगळे, सुनीता सांगळे, संगीता सांगळे यांनी गटविकास अधिकाऱ्यांना घेराव घालून ग्रामविकास अधिकारी देण्याची मागणी केली. पुन्हा मोरे यांनाच निऱ्हाळे येथे जाण्याचे आदेश दिल्यानंतरही ते न आल्याने पांगरीचे डहाळे यांच्याकडून मासिक बैठका व इतर उपक्रम राबवून घेण्यात आले. त्यानंतर डहाळे यांचीही बदली झाल्यानंतर मानोरीच्या ग्रामसेवक एस. के. सानप यांच्याकडे निऱ्हाळेचा कार्यभार सोपविण्यात आला. कार्यभार स्वीकारल्यानंतर सानप पुन्हा निऱ्हाळेत आल्या नसून कोणाचे काम असल्यास मानोरीला पाठवण्याची ‘सूचना’ त्यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने विकासकामे रखडली असून, झालेल्या कामांचीही बिले कशी अदा करावी, असा प्रश्न पदाधिकाऱ्यांसमोर ठाकला आहे. लवकरात लवकर पूर्णवेळ ग्रामसेवक न दिल्यास ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा सरपंच दराडे यांच्यासह ग्रामस्थांनी दिला आहे. (वार्ताहर)