नाशिक : कांद्याचे भाव कोसळल्याने कांद्याचा प्रश्न नाशिकसह अहिल्यानगर, बीड, पुणे, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा पेटला असून, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. नाशिक जिल्ह्यात दोन ठिकाणी दोन दिवसांत केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटविण्यासाठी आंदोलन झाले. राज्य मंत्रिमंडळात कृषिमंत्रिपदी सिन्नरचे (जि. नाशिक) आमदार माणिकराव कोकाटे यांची निवड झाली. त्यांच्यासमोर आता कांद्याचा प्रश्न सोडविण्याचे सर्वांत मोठे आव्हान असेल. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर लावलेले २० टक्के निर्यात शुल्क तत्काळ हटविण्याची मागणी आता जोर धरू लागली. सरकारवर निर्यात शुल्क हटविण्यासाठी दबाव वाढला आहे. कांद्याला सरासरी भाव ४२०० ते ४६०० रुपये क्विंटल याप्रमाणे मिळत होता, परंतु बाजार समित्यांमध्ये आवक वाढताच भाव घसरले. सात दिवसांपासून सरासरी १२०० ते १३०० रुपये भाव मिळत आहे.
कायमस्वरुपी तोडगा काढू : कृषिमंत्री कोकाटे केंद्रीय कृषिमंत्र्यांशी बोलून कांदाप्रश्नी कायमस्वरूपी तोडगा काढू, अशी ग्वाही कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी दिली. रविवारी नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. पीक विमा घोटाळा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.