अंगणवाडी सेवकांची जादा मानधनाची मागणी
By Admin | Updated: July 28, 2014 23:31 IST2014-07-28T22:39:34+5:302014-07-28T23:31:55+5:30
अंगणवाडी सेवकांची जादा मानधनाची मागणी

अंगणवाडी सेवकांची जादा मानधनाची मागणी
नांदगाव : महाराष्ट्र शासनाने वस्तीशाळा शिक्षकांना मानधनाऐवजी वेतन देण्याचा निर्णय घेतला. तसाच निर्णय मिनी अंगणवाडी सेवकांना देखील किमान पाच हजार रुपये प्रतिमाह मानधन देण्याची मागणी नांदगाव तालुक्यातील मिनी अंगणवाडी सेवकांनी केली आहे.
यापूर्वी अंगणवाड्या फक्त गावातच होत्या. त्यामुळे गावापासून दूर असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील बालके, किशोरवयीन मुली, गर्भवती, शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होत्या. म्हणून या वस्त्यांसाठी मिनी अंगणवाड्यांची निर्मिती करून तेथे दहावी पास ते पदवीधर तरुणी, महिलांची नियुक्ती करण्यात आली. नियमित अंगणवाडीत कष्टाच्या कामासाठी मदतनीस व लिखाणासाठी सेवकांची नियुक्ती असते. मात्र मिनी अंगणवाडीत ही दोन्ही कामे मिनी अंगणवाडी सेवकांनाच करावी लागतात. मोठ्या अंगणवाडीतील मदतनीसांना दोन हजार रुपये मानधन मिळते. मात्र वरील दोन्ही प्रकारची कामे करूनही या मिनी अंगणवाडी सेवकांना मदतनीसांइतकेच म्हणजे दोन हजार रुपये मानधन मिळते. नांदगाव तालुक्यातील आदिवासी वस्त्यांवरील बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी मिनी अंगणवाडी सेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तसेच मिनी अंगणवाडीच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मुलींनाही पोषण आहार देण्यात यावा, अशी मागणी मिनी अंगणवाडी सेवकांनी केली आहे. (वार्ताहर)