मराठा समाजास आरक्षण घोषित करण्याची मागणी
By Admin | Updated: October 31, 2015 23:55 IST2015-10-31T23:53:41+5:302015-10-31T23:55:13+5:30
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुचाकी रॅली काढणार

मराठा समाजास आरक्षण घोषित करण्याची मागणी
रनाशिक : गेल्या विधानसभा, लोकसभा निवडणुकीत गाजलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा आता राजकारण्यांच्या विस्मरणात गेल्याने पुढच्या पंचवार्षिकतेपर्यंत आरक्षणाचे घोंगडे भिजत राहण्याची शक्यता असल्याचा आरोप करीत मराठा समाजास विद्यमान सरकारने त्वरित आरक्षण घोषित करावे, या मागणीचे निवेदन माजी खासदार देवीदास पिंगळे, नगरसेवक दिनकर पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.
गेल्या सरकारने मराठा समाजास आरक्षण घोषित करण्यासाठी तत्कालीन महसूलमंत्री नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. मात्र या समितीने कुठलाही सकारात्मक निर्णय न घेता केवळ निवडणुकांचा अंदाज लक्षात घेऊन मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. हाच कित्ता भाजपा-शिवसेना सरकारने न गिरविता समाजाच्या भावना लक्षात घेऊन आरक्षण तातडीने घोषित करायला हवे. या मागणीसाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी मुंबईपर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार असून, वेळप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीदेखील शिष्टमंडळ भेट घेणार असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. दरम्यान, याप्रसंगी रामदास चव्हाण, मधुकर खांडबहाले, निवृत्ती शिंदे, पुंजाराम थेटे, सोपान मते, हिरामण बेंडकोळी, निखील झांबरे, अमोल पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)