गॅसनोंदणी संदेशाद्वारे रद्द करण्याची मागणी
By Admin | Updated: July 24, 2014 01:02 IST2014-07-23T22:20:38+5:302014-07-24T01:02:22+5:30
गॅसनोंदणी संदेशाद्वारे रद्द करण्याची मागणी

गॅसनोंदणी संदेशाद्वारे रद्द करण्याची मागणी
कळवण : येथील इंडेन गॅस एजन्सीत सिलिंडर नोंदणीसाठी भ्रमणध्वनीद्वारे संदेश पाठविणे सक्तीचे केले जात आहे. ही सक्ती रद्द करीत सिलिंडर नोंदणीची पूर्वीचीच पद्धत सुरू ठेवावी, अशी मागणी कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांच्याकडे करण्यात आली आहे.
कळवण हा आदिवासीबहुल तालुका असून, बहुतांशी आदिवासी आजही शेतमजूर म्हणून इतर तालुक्यात मजुरीसाठी कामाला जात आहे. सर्वसामान्य ग्राहक व महाराष्ट्र वनविभागाने जंगलाच्या जवळपासच्या गावातील गरीब आदिवासी कुटुंबाला जळावू लाकूड वापरापासून वंचित करण्यासाठी अनुदानावर गॅस कनेक्शनचे वाटप केले आहे. अशा गरीब कुटुंबांकडे एक वेळच्या अन्नाच्या समस्या असताना भ्रमणध्वनी कुठून येणार, असे असताना त्यांच्याकडील संपलेले सिलिंडर नोंदण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संदेश पाठविणे सक्तीचे केले जात आहे. त्यामुळे त्यांना सिलिंडर मिळत नसल्याने त्यांनी पुन्हा पर्यायी व्यवस्था म्हणून जळावू लाकडाचा उपयोग सुरू केला आहे. त्यामुळे जंगलांचा ऱ्हास होणार असल्याने प्रशासनाने वेळीच संबंधित एजन्सीला सूचना करीत पूर्वीचीच पद्धत सुरू ठेवण्यास भाग पडावे, अशी मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)