कांदा साठेबाजांवर कारवाईची मागणी

By Admin | Updated: June 28, 2014 01:20 IST2014-06-27T21:20:48+5:302014-06-28T01:20:19+5:30

तावडेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे: कृत्रिम टंचाईचा दावा

Demand for action on onion stockists | कांदा साठेबाजांवर कारवाईची मागणी

कांदा साठेबाजांवर कारवाईची मागणी

तावडेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे: कृत्रिम टंचाईचा दावा
  व्यापारी आणि एपीएमसी मधील अधिका-यांच्या साटेलोट्यामुळे कांद्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. यामुळेच मुबलक प्रमाणात उपलब्ध असूनही कांद्याचे भाव कडाडले आहेत. या प्रकरणी राज्य शासनाने तातडीने लक्ष घालून साठेबाजांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी आज पत्र परिषदेत केली.
सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा हा नुकत्याच संपलेल्या हंगामातील आहे. त्यामुळे लांबलेल्या मान्सूनचा बाजारपेठेतील कांद्यावर कोणताही परिणाम झालेला नाही. केवळ साठेबाजांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे कांद्याची भाववाढ होत आहे. त्यामुळे या साठेबाजांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचेकडे लेखी पत्र पाठवून केली आहे, असे तावडे यांनी सांगितले.
यापूर्वीही अनेकवेळा कांद्याची भाववाढ झाली. अशा प्रसंगी राज्य सरकारने पूर्वीच्या युपीए सरकारला काही सूचना केल्या असतील अथवा केंद्राने काही विशेष उपाय योजले असतील, तर त्याची माहिती द्यावी. जेणेकरून केंद्र सरकारशी योग्य समन्वय साधता येईल आणि राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी व सामान्य जनतेवर अन्याय होणार नाही यासाठी प्रयत्न करता येईल, असे आपण मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केल्याची माहिती तावडे यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for action on onion stockists