टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी
By Admin | Updated: July 25, 2016 23:38 IST2016-07-25T23:35:11+5:302016-07-25T23:38:23+5:30
टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी

टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी
नामपूर : ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थिनींची महाविद्यालय परिसरात छेडछाडद्याने : नामपूर (ता. बागलाण) येथील महाविद्यालयात ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी जात असतात. मात्र बसस्थानक परिसरात टवाळखोरांनी हैदोस घातला आहे. महाविद्यालयात रस्त्याने जाताना मुलींना रस्त्यावर अडवणे, धूम स्टाईलने दुचाकी चालवणे, अश्लील हावभाव करणे, रस्त्यावर दमदाटी करणे असे अनेक प्रकार विद्यार्थिनींना निमूटपणे सहन करावे लागत आहेत. पोलिसांनी वेळीच टवाळखोरांवर कठोर कारवाई केली नाही तर नगर जिल्ह्यातील कोपर्डीत झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्यास वेळ लागणार नाही. अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करावी, याबाबतचे निवेदन शिवसेनेचे शहरप्रमुख तथा बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक समीर सावंत व पालकांनी नामपूर येथील पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोळी यांना दिले.
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थिनी नामपूर बसस्थानकापासून महाविद्यालयात रस्त्याने जा-ये करतात. ग्रामीण भागातील पालक विश्वासाने मुलींना शिक्षणासाठी बाहेरगावी पाठवतात. हा प्रकार घरी सांगितला तर पालक शिक्षण बंद करतील या भीतीपोटी विद्यार्थिनी सहन करीत आहेत. खासगी क्लासेसजवळही रिक्षात बसून मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व प्रकाराला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे, असे निवेदन पोलीस उपनिरीक्षक एस. बी. कोळी यांना देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख समीर सावंत, स्नेहराज सावंत, अशोक चौधरी, सोनू भामरे, मंगेश नेरे, जावेद शेख, तुषार आहिरे, अनिल खैरनार विकी सावंत आदि उपस्थित होते. (वार्ताहर)