मतदान याद्या ऐनवेळी बदलल्याने संभ्रम
By Admin | Updated: February 21, 2017 00:54 IST2017-02-21T00:54:45+5:302017-02-21T00:54:59+5:30
पालिकेचा गोंधळ : निवडणूक अधिकाऱ्यांकडून सुधारणेचे आश्वासन

मतदान याद्या ऐनवेळी बदलल्याने संभ्रम
नाशिकरोड : मनपा निवडणुकीत प्रभाग २० व २१ च्या मतदार यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करताना निवडणूक विभागाकडून झालेल्या चुकीमुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे. निवडणूक शाखेकडून अंतिम मतदार यादी गेल्या बुधवारी १५ फेब्रुवारीला संकेत स्थळावरून प्रसिद्ध करण्यात आली. तसेच उमेदवारांना सीडीदेखील उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रभाग २० व २१ मधील उमेदवार, पक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अंतिम मतदार यादीनुसार प्रचाराचे व मतदान स्लिपा वाटण्याचे नियोजन केले. राजीव गांधी भवनामधून प्रभाग २० व २१ च्या दोन सिडींची विक्रीदेखील झाली होती. मात्र निवडणूक विभागाला गेल्या गुरूवारी या दोन प्रभागातील काही मतदान खोल्यांचे ‘पेजशीट’ बदलण्याचे राहून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ ती चुक सुधारली. तसेच ज्या दोन सिडी विक्रीस गेल्या होत्या त्यांच्याशी संपर्क साधून त्या दोन सीडी जमा करण्यात आल्या. मात्र या दोन दिवसाच्या काळात उमेदवार, प्रचार समिती आदिंनी संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रभाग २० व २१ ची मतदार यादी मिळवून त्यानुसार काम सुरू केले. ज्या दोन सिडी विक्रीस गेल्यानंतर त्या पुन्हा ताब्यात मिळेपर्यंत तिच्या किती कॉपी करण्यात आल्या हे मात्र स्पष्ट झाले नाही. निवडणूक विभागाला झालेली ही चूक लक्षात आल्यानंतर ती तत्काळ सुधारण्यात आली. मात्र त्याबाबत उमदेवार आणि मतदारांना अवगत केले गेले नाही. त्यामुळे १५ फेब्रुवारीला प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसारच सर्वच उमेदवार, पक्ष, कार्यकर्ते प्रचाराला लागले होते. निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात गेल्या २ - ३ दिवसांपासून त्या मतदार यादीनुसार उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी मतदार स्लिपा वाटत आहे. निवडणूक शाखेकडूनदेखील मतदान स्लिपा वाटण्यात येत आहे. रविवारी सायंकाळी प्रभाग २० व २१ मध्ये काही मतदारांना पक्षीय उमेदवार व निवडणूक शाखेकडून मिळालेली मतदानाच्या स्लिपमध्ये तफावत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संभ्रमावस्था निर्माण झाली. मतदान यादी प्रसिद्ध करताना झालेला गोंधळ लक्षात येताच दुर्गा उद्यान येथील मनपा विभागीय कार्यालयात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप व इतर पक्षाचे कार्यकर्ते यांनी निवडणूक विभागांच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन समेट घडवत नवीन मतदार यादीचा डाटा देण्याचे सांगितल्यानंतर वाद मिटला. यामुळे मात्र उमेदवार व पक्षांनी मतदारांना घरोघर वाटलेल्या वाटलेल्या मतदानाच्या स्लिपा चुकीच्या ठरल्या असुन उमेदवारांना नवीन स्लिपा वाटण्याची पाळी आली आहे. प्रभाग २० मध्ये खोली क्र. ८ ते ३३ या २६ खोल्या व प्रभाग २१ मध्ये खोली २१ ते २९ या ९ खोल्यांमध्ये असलेल्या मतदानाच्या उमेदवारांनी वाटलेल्या स्लिपा चुकीच्या ठरल्या असून, त्यांचे मतदान केंद्र व खोल्या बदलल्या गेल्या आहेत. यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांचा मतदान कुठे करायचे म्हणून चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)