नाशिकच्या सायकलपटूंची दिल्ली ते मुंबई रॅली
By Admin | Updated: December 4, 2015 22:04 IST2015-12-04T22:03:52+5:302015-12-04T22:04:18+5:30
स्वच्छता जनजागृती : ३० हजार पत्रकांचे वाटप

नाशिकच्या सायकलपटूंची दिल्ली ते मुंबई रॅली
पाथर्डी फाटा : स्वच्छ भारत, स्वस्थ भारत अभियानाच्या प्रसारासाठी नाशिकच्या सायकलपटूंनी दिल्ली ते मुंबई जनजागृती सायकल रॅली आजपासून सुरू केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून दिल्लीतून रॅलीस प्रारंभ झाला.
दिल्लीच्या इंडिया गेटपासून सुरू झालेली ही रॅली राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र राज्यातून १६५० कि.मी.चा प्रवास करून दि. १३ डिसेंबर रोजी मुंबईच्या गेटवे आॅफ इंडिया येथे पोहचणे अपेक्षित आहे. या रॅलीस डॉ. राजेश पाटील, अॅड. दिलीप राठी, अॅड. वैभव शेटे, राजेंद्र फड, विलास वाळके, तुकाराम नवले सहभागी झाले आहेत. उद्घाटन कार्यक्रमप्रसंगी भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्त्रबुद्धे, खासदार हेमंत गोडसे, कॅप्टन नीलेश गायकवाड, रॅलीचे समन्वयक डॉ. अमोल पाटील उपस्थित होते.
सायकल रॅलीच्या मार्गावरील गावांमध्ये हे सायकलिस्ट स्वच्छतेबाबत, पर्यावरण रक्षण, सायकलचा वापर याविषयीचे सुमारे ३० हजार जनजागृती पत्रके वाटप करणार आहेत. मागीलवर्षीदेखील नाशिकच्या सायकलपटूंनी नाशिकचे गोवा अशी सायकल रॅली काढली होती. (वार्ताहर)दिल्लीतील इंडिया गेट येथे सायकल रॅलीचा झेंडा दाखवून शुभारंभ करताना विनय सहस्त्रबुद्धे, खासदार हेमंत गोडसे.