आमदारांच्या शिष्टमंडळाला ग्वाही; निधीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा
By Admin | Updated: November 14, 2014 00:47 IST2014-11-14T00:26:09+5:302014-11-14T00:47:45+5:30
आमदारांच्या शिष्टमंडळाला ग्वाही; निधीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा

आमदारांच्या शिष्टमंडळाला ग्वाही; निधीच्या पूर्ततेसाठी पाठपुरावा
नाशिक : महापालिकेवर कर्जाचा डोंगर असल्याने स्थिती बिकट बनली आहे; मात्र प्रशासकीय कारभार सक्षमपणे पार पाडल्यास सदर स्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही व त्या दृष्टीने मी कायम प्रयत्नशील राहणार आहे. पालिकेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत मी बैठका घेण्यास प्रारंभ केला असून, नाशिककरांच्या नागरी समस्या तातडीने सोडविल्या जातील, असा शब्द महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी भाजपा आमदारांच्या बैठकीत दिला.गेल्या साडेआठ महिन्यांपासून महापालिकेला आयुक्त नसल्यामुळे प्रशासकीय कारभार पूर्णत: थंडावला होता. सर्व विभागांमधील अधिकाऱ्यांना जणू काही एक प्रकारची मरगळ आली होती. त्यामुळे नागरिकांमध्येदेखील तीव्र संताप व्यक्त केला जात होता; मात्र सध्या महापालिकेच्या वाऱ्यावर असलेल्या प्रशासनाला नियंत्रणात ठेवण्यासाठी आयुक्त लाभल्याने नाशिककरांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नवनिर्वाचित आयुक्तांची आज (दि. १३) भाजपाचे आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, बाळासाहेब सानप, राहुल अहेर या चार आमदारांसह शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने आवश्यक असलेल्या विविध सोयीसुविधा तातडीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. त्यासाठी लागणाऱ्या निधीच्या पूर्ततेसाठी भाजपा राज्य व केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याकामी प्रशासनाला मदत करेल, असे आश्वासन आमदारांनी यावेळी गेडाम यांना दिले. येत्या दहा दिवसांमध्ये आरोग्य विभागाने शहरातील धोक्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्याबाबत तातडीने पाऊले उचलावी व डेंग्यूला प्रतिबंध घालण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याच्या सूचना यावेळी आमदारांनी केल्या. दरम्यान, गेडाम यांनी सर्व सूचनांचे स्वागत करत आवश्यक त्या सर्व उपाययोजनांना सुरुवात करण्यात आली असून, मी वैयक्तिपणे लक्ष घालून आरोग्य विभागामार्फत शहरात व्यापक मोहिमा राबविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)