आरोग्य उपकेंद्राचा बोजवारा
By Admin | Updated: September 22, 2016 00:58 IST2016-09-22T00:50:22+5:302016-09-22T00:58:14+5:30
वेहेळगाव : सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप

आरोग्य उपकेंद्राचा बोजवारा
साकोरा : तालुक्यातील वेहेळगाव आरोग्य केंद्रांतर्गत साकोरा आरोग्य उपकेंद्राची अवस्था दयनीय व समस्याग्रस्त झाली आहे. ग्रामीण भागातील गरीब जनतेला जलद गतीने आरोग्याच्या मूलभूत सुविधा मिळाव्यात या चांगल्या हेतूने शासनाने या गावात आरोग्य उपकेंद्र सुरू केले. सुरुवातीला चांगल्या सुविधांचा लाभ गरीब जनतेला झाला. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे आरोग्य सेवेचा बोजबारा उडाला आहे.
या उपकेंद्रांतर्गत नवे पांझण, कोकणवाडा, सोसायटी, निमतळा, तसेच इतर तीन अदिवासी भागाचा समावेश आहे. या उपकेंद्रात महिला परिचारिका मुख्यालयी राहत नसल्याने अनेकदा रुग्ण येऊन परत जाताना दिसतात. काही वर्षांपूर्वी या ठिकाणी चार कर्मचारी कार्यरत होते; मात्र आज केवळ एक पुरुष व एक महिला येतात तेही त्यांच्या सवडीनुसार. त्यामुळे या केंद्राचा असून-नसून खोळंबाच झालेला आहे. गेल्या दोन वर्षापूर्वी निकृष्ट सेवेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी
कुलूप ठोकले होते. मात्र आजपर्यंत कुठलीही सुधारणा झाली नाही. या उपकेंद्रात स्वच्छ पिण्याचे पाणी नाही, गोळ्या-औषधे साठविण्यासाठी वातानुकूलित यंत्रे नाहीत.
शासनाने सर्वसामान्य जनतेसाठी सुरू केलेल्या या उपकेंद्राच्या मूळ हेतूलाच येथील अपुऱ्या कर्मचाऱ्यांकडून हरताळ फासला जात असल्याचे बोलले जात आहे. या ठिकाणी कार्यक्षम वैद्यकीय अधिकारी व पुरेसे सेवक नेमावेत
व जनतेला आरोग्य सेवेचा संपूर्ण लाभ व्हावा, अशी मागणी सरपंच वैशाली झोडगे व उपसरपंच अतुल पाटील यांनी गावकऱ्यांतर्फे केली आहे. (वार्ताहर)
आरोग्य कर्मचाऱ्यांचीही वानवा
परिसरात एक अंगणवाडी असून, तिलादेखील काटेरी गवताने विळखा घातला आहे. सुलभ शौचालयांचा अभाव असून, सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे विषारी कीटक, डास, मच्छर यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.गेल्या दोन महिन्यांपासून या भागात संसर्गजन्य आजाराचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. तसेच दोन डेंग्यूचे रूग्ण आढळले होते. एका अदिवासी भागात आरोग्य कर्मचारी दररोज जात नसल्याने एका घरात मलेरियाच्या अधिक गोळ्या देऊन आठवडाभर आपली त्या भागातून सुटका करवून घेतली होती. मात्र दुसऱ्याच आठवड्यात एका लहान मुलगा आजारी पडल्याने त्या तीन-चार गोळ्या एकाच वेळी खाल्ल्याने त्याचा जीव गेला. मात्र त्याची कुठलीही खबरदेखील या विभागाला झाली नाही. त्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे.