दीपपूजनाने उजळली अमावास्या
By Admin | Updated: July 27, 2014 00:15 IST2014-07-26T23:55:24+5:302014-07-27T00:15:38+5:30
दीपपूजनाने उजळली अमावास्या

दीपपूजनाने उजळली अमावास्या
नाशिक : घनघोर पावसाचा आषाढ आणि तुरळक पावसाचा श्रावण यांना जोडणारा दिवस म्हणजे आषाढ अमावास्या. या अमावास्येला दीप अमावास्या म्हणूनही ओळखले जाते. यानिमित्ताने घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली गेली.
या दिवशी घरातील सर्व समई, निरंजने, दिवे नीट घासून पुसून त्यांची देवघरात पूजा केली जाते. घरातील सुवासिनी घरात दिवे लावून त्याभोवती रांगोळ्या काढतात आणि त्यांची पूजा करतात. घर प्रकाशाने भरून टाकतात. अशावेळी घरात आलेली लक्ष्मी घराबाहेर जात नाही असा समज आहे. दीप अमावास्येनिमित्त कणकेचे दिवे उकडून त्यात ज्योत पेटवली गेली. सायंकाळी गोड पदार्थांचा त्या दिव्यांना नैवेद्य दाखविला गेला. सर्वच दिवे लावताना आधुनिक दिवे असलेल्या लाइटच्या माळादेखील लावण्यात आल्याचे ठिकठिकाणी दिसून आले.
यंदाची दीप अमावास्या शनिवारी आल्याने शनिमंदिरातही दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. सकाळपासून शहरातील शनिमंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. काही ठिकाणी यागही करण्यात आले. (प्रतिनिधी)