पाथरे भागात तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: July 12, 2014 00:30 IST2014-07-11T22:17:46+5:302014-07-12T00:30:35+5:30
पाथरे भागात तीव्र पाणीटंचाई

पाथरे भागात तीव्र पाणीटंचाई
सिन्नर : तालुक्याच्या पूर्वभागातील पाथरे परिसरातील वाड्या-वस्त्यांवर पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, वाड्या-वस्त्या या योजनेपासून वंचित राहिल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.
यंदा पावसाने प्रचंड ओढ दिल्याने खरिपाचा हंगाम हातचा जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाअभावी पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेतीच्या पाण्यासह पिण्याचे पाणी तसेच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण केले असून, यापुढे काही दिवस पाऊस झाला नाही तर पाण्याची स्थिती खूपच बिकट होण्याची चिन्हे आहे. त्यामुळे आतापासूनच नियोजन करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून ११ गाव नळपाणीपुरवठा योजनेसाठी येथील गोदावरी उजव्या कालव्यालगत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे सध्यातरी गावात पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र गावाच्या परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी या योजनेचा काहीही लाभ झाला नाही. यापूर्वी विहिरींना पाणी असल्याने वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांना पाण्याच्या टंचाईच्या झळा जाणवत नव्हत्या.
यंदा मात्र पाऊसच नसल्याने विहिरी व अन्य जलस्रोत ठणठणीत कोरडे पडले आहेत. परिणामी शेतीच्या पाण्यासह पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे पाथरेकरांना पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. या योजनेतून वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी या योजनेतून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांकडून केली जात आहे. (वार्ताहर)