जिल्हा रुग्णालयासाठी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:17 IST2021-09-24T04:17:54+5:302021-09-24T04:17:54+5:30
नाशिक : जिल्ह्यातील नागरिक, गरोदर महिला व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर ...

जिल्हा रुग्णालयासाठी १० रुग्णवाहिकांचे लोकार्पण !
नाशिक : जिल्ह्यातील नागरिक, गरोदर महिला व गरजू रुग्णांना वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यादृष्टीने आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगानेच कोरोनासोबतच इतर काळातही चांगल्या दर्जाची आरोग्य सेवा देण्यासाठी शासन सज्ज असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. जिल्हा सामान्य रुग्णालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते १० रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा पार पडल्यानंतर ते बोलत होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, कोरोनासारख्या कठीण काळात नातेवाईक रुग्णाला सोबत घेऊन जाऊ शकत नव्हते. मात्र, रुग्णवाहिका चालक त्यांना दवाखान्यात घेऊन येणे आणि परत आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करत होते. त्यामध्ये डॉक्टर, परिचारिका व आरोग्य सेवेतील इतर कर्मचारी तसेच पोलीस यंत्रणा व अन्न धान्य पुरवठा विभाग यांनीदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडली असून, ईश्वर सेवा समजून जनसेवा केली ही अतिशय महत्त्वपूर्ण बाब आहे. याच पार्श्वभूमीवर १० रुग्णवाहिका गुुरुवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाला उपलब्ध झाल्या आहेत. याचा अधिक फायदा ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना होणार असल्याचेही पालकमंत्री भुजबळ यांनी सांगितले. जिल्ह्यात काेरोनाच्या पार्श्वभूमीवर या आजाराचे वेळेत निदान होण्यासाठी २० हजार रूग्णांचे टेस्टींग करू शकेल, एवढी यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यात ३२ संस्थांकडे ४१ तर जिल्हा परिषदे अंतर्गत ११२ अशा एकूण १५५ रूग्णवाहिका सध्या नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत. कोरोना काळात या रूग्णवाहिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागून शासनाला व आरोग्य सेवेला सहकार्य करावे, असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार हिरामण खोसकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.