डी.एड. प्रवेशप्रक्रियेचा आज शेवटचा दिवस
By Admin | Updated: July 12, 2014 00:26 IST2014-07-11T23:37:46+5:302014-07-12T00:26:27+5:30
डी.एड. प्रवेशप्रक्रियेचा आज शेवटचा दिवस

डी.एड. प्रवेशप्रक्रियेचा आज शेवटचा दिवस
नाशिक : गेल्या ६ तारखेपासून सुरू झालेल्या डी.एड. प्रवेशप्रक्रियेच्या आजच्या चौथ्या दिवसापर्यंत सुमारे ९४३ इतके प्रवेश झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कला शाखेसाठी प्रवेशाचा राउंड सुरू झाला असून, येत्या शनिवारी इंग्रजी आणि उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होणार आहेत.
शहरातील बी. डी. भालेकर हायस्कूल येथे सदर प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे ४२ महाविद्यालयांसाठी प्रक्रिया सुरू असून, पहिले दोन दिवस विज्ञान शाखेचे प्रवेश करण्यात आले. त्यानंतर गेल्या मंगळवारी कला शाखेचे २१५, बुधवारी २२९ तर गुरुवारी २१९ इतक्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. शुक्रवार दि ११ रोजी देखील कला शाखेचेच प्रवेश दिले जाणार आहेत. शनिवारी उर्दू आणि इंग्रजी माध्यमांसाठी प्रवेशाची प्रक्रिया राबविली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणारी ७० टक्के प्रवेशप्रक्रिया १२ तारखेपर्यंत चालणार आहे. जिल्ह्यातील उपलब्ध जागा आणि त्यासाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहाता यावर्षी अर्ज दाखल केलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्तकेले जात आहे. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून विद्यार्थी न मिळाल्यामुळे रिक्त राहणाऱ्या जागा या कला शाखेकडे वर्ग केल्या जात असल्यामुळे कला शाखेतून अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश सोपा होणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा डायटचे प्राचार्य बच्छाव यांनी दिली. (प्रतिनिधी)