नवीन रुग्णांच्या संख्येत घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:13 IST2021-05-30T04:13:13+5:302021-05-30T04:13:13+5:30
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत सलग घट होत असून, शनिवारी (दि.२९) जिल्ह्यात केवळ नवीन ८५८ कोरोनाबाधित आढळले असून, ...

नवीन रुग्णांच्या संख्येत घट
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संख्येत सलग घट होत असून, शनिवारी (दि.२९) जिल्ह्यात केवळ नवीन ८५८ कोरोनाबाधित आढळले असून, नवीन आढळलेल्या रुग्णांच्या तुलनेत अडीच पट अधिक म्हणजेच २,३०२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनामुक्त नागरिकांची संख्या सातत्याने बाधितांच्या तुलनेत अधिक राहत आहे. मात्र, बळींच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने तो जिल्ह्यासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शनिवारी एकूण उपचारार्थी रुग्णांच्या संख्येत अजून घट होऊन ही संख्या १० हजार ४९५ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये ३४१, तर नाशिक ग्रामीणला ४७५ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात २२, तर जिल्हाबाह्य २० रुग्ण बाधित आहेत, तर जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात १७, ग्रामीणला २३ आणि मालेगाव मनपात ८, असा एकूण ४८ जणांचा बळी गेला आहे. एकीकडे कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी प्रदीर्घ काळापासून उपचार घेऊनही बरे न झालेले रुग्ण दगावत असल्यानेच बळींच्या संख्येत वाढ दिसत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
इन्फो
कोरोनामुक्तचे प्रमाण ९६ टक्क्यांवर
जिल्ह्यात कोरोनामुक्त रुग्णांच्या संख्येत थोडी वाढ होऊन ते प्रमाण ९६.०७ टक्क्यांवर पाेहाेचले आहे. त्यात जिल्हाबाह्य रुग्णांचा दर ९७.०२ टक्के, नाशिक शहर ९६.९८, नाशिक ग्रामीण ९५.१८, तर मालेगाव मनपाचा कोरोनामुक्तीचा दर ८९.४४ टक्क्यांवर पाेहोचला आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल दोन हजारांखाली
जिल्ह्यातील प्रलंबित अहवालांची संख्या घटून १,७७५ वर आली आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या घटू लागल्याने आता दोन दिवसांतच अहवाल मिळू लागले आहेत. त्यामुळेच शनिवारी नाशिक शहरातील ३८६, नाशिक ग्रामीणचे १,१२०, तर मालेगाव मनपाचे २६९, असे एकूण १,७७५ अहवाल प्रलंबित होते.