जिल्ह्याच्या पीक उत्पादनात घट
By Admin | Updated: November 20, 2014 00:32 IST2014-11-20T00:32:15+5:302014-11-20T00:32:15+5:30
जिल्ह्याच्या पीक उत्पादनात घट

जिल्ह्याच्या पीक उत्पादनात घट
नाशिक : जिल्ह्यातील सुधारित पीक आणेवारीत पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक गावांचा समावेश असल्याने त्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता, अधिकाऱ्यांनी दिलेले अहवाल वस्तुनिष्ठ असल्याचा निर्वाळा पालक सचिव श्रीकांत सिंह यांनी दिला. पीक कापणी प्रयोगानंतर प्रत्यक्ष पीक उत्पादनाचा अंदाज येणार असला, तरी प्रत्यक्षात जिल्ह्यातील पीक उत्पादनात घट होण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
महसूल व कृषी अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली. शासनाने दिलेल्या आदेशानुसार पीक आणेवारी कमी येण्यामागच्या कारणांची मीमांसा करण्यासाठी अगोदरच दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्याची मुद्दाम निवड करण्यात आली.
प्रत्यक्ष भेट दिल्यावर अधिकाऱ्यांनी केलेली पीक आणेवारी वस्तुनिष्ठ असल्याचे आढळून आले; परंतु पीक कापणी प्रयोगानंतरच उत्पादनाचा खरा अंदाज येणार असल्याने अधिकाऱ्यांनी ती काळजीपूर्वक करावी अशा सूचना आपण दिल्या असून, तसे झाल्यासच कायमस्वरूपी पीक आणेवारी निश्चित करता येणे शक्य असल्याची माहिती त्यांनी दिली. या पाहणीचा अहवाल शासनाला दिल्यानंतर दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याबाबत शासन निर्णय घेऊ शकेल असे सांगून, मराठवाड्यातही काही ठिकाणी कमी आणेवारी आल्याने तेथेही पाहणी करण्यात आल्याची पृष्टी जोडली. (प्रतिनिधी)