मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
By Admin | Updated: November 28, 2014 00:11 IST2014-11-28T00:11:46+5:302014-11-28T00:11:58+5:30
कामगार मृत्यू प्रकरण : कुटुंबीयांसह कंत्राटी कामगारांचे सहा तास तीव्र आंदोलन

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
नाशिक : गटारीच्या चेंबर दुरुस्तीचे काम करताना विषारी गॅसने गुदमरून मरण पावलेल्या तीन कामगारांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत व ठेकेदाराच्या अटकेची मागणी करीत, कर्मचाऱ्यांचे संतप्त कुटुंबीय तसेच कंत्राटी कामगारांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देत जिल्हा रुग्णालयाबाहेर तीव्र आंदोलन करीत रास्ता रोको केला. महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी व पोलीसांनी बहुविध प्रयत्न करूनही आंदोलक दाद देत नसल्याने अखेर लिखित आश्वासन दिल्यावर मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
गंगापूररोडवरील सोमेश्वर परिसरात चेंबर दुरुस्तीसाठी गेलेल्या तीन कंत्राटी कामगारांचा बुधवारी दुपारी गुदमरून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती़ यामध्ये हिरामण जानू माढे, गोपीनाथ धोंडीबा मोरे व प्रशांत चिंधू चौधरी यांचा मृत्यू झाला होता़ गुरूवारी सकाळी या तिघांच्या मृतदेहांची उत्तरीय तपासणी जिल्हा रुग्णालयात करण्यात आली, यावेळी सकाळी ९ पासून रुग्णालयाबाहेर त्यांचे नातेवाईक, कंत्राटी कामगार तसेच सीटूसह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र जमून मृतांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करावी, कायमस्वरूपी नोकरी द्यावी तसेच इतर मागण्या करून गोंधळ घातला. या मागण्या मान्य करून तसे लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेतल्याने जिल्हा रूग्णालयात तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी महापालिका व पोलिसांविरोधात घोषणा सुरू केल्या त्यामुळे पोलिसांनी तातडीने महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, उपआयुक्त पगारे यांना गळ घालून आंदोलकांची समजूत काढावी अशी विनंती केल्याने महापौर मुर्तड यांनी रूग्णालयात धाव घेवून मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. परंतु लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतल्यावर महापौर व उपमहापौरांना काढता पाय घ्यावा लागला़ त्यानंतर आंदोलकांनी थेट त्र्यंबकरोडवर धाव घेवून दोन्ही बाजुचा रस्ता रोकला. परिणामी भर वर्दळीच्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्यावर पोलिसांची धावपळ उडाली. सुमारे तास भर त्यांनी ठिय्या दिला.
अखेरीस महापालिका आयुक्तांशी चर्चा करून महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, नगरसेवक संजय साबळे, तानाजी जायभावे, महापालिकेचे प्रशासन उपआयुक्त विजय पगार, आनंद सोनवणे यांनी लेखी पत्र आंदोलनकर्त्यांना वाचून दाखवले़ त्यामध्ये शासकीय तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येईल, विशेष बाब म्हणून या कामगारांच्या वारसांना महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव शासनास पाठविण्यात येईल व कंत्राटदाराकडून आर्थिक मदत मिळवून देण्यात येईल, अशी आश्वासने देण्यात आल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेत अखेर मृतदेह ताब्यात घेतले़ (प्रतिनिधी)