मालेगाव: या देशात बहुसंख्य हिंदू असल्याने हिंदूंचा सन्मान झाला पाहिजे. साधू-संतानी देश, राष्ट्रभक्तीसाठी तसेच धर्मासाठी जीवन वेचले असल्याने देशाला हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करा, अशी मागणी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय संत समितीचे महामंत्री भारतानंद सरस्वती यांनी केले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मालेगाव शहरातील सटाणा रोडवरील यशश्री कम्पाउंडमध्ये रविवारी आयोजित हिंदू संत साहित्य संमेलनात ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. वारकरी संप्रदायाचे हभप संग्राम भंडारे, महावीर मिशनचे संस्थापक नीलेशचंद्र आदींनी मार्गदर्शन केले. अनेक चढउतार पाहावयास मिळालेल्या या संमेलनास दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सुरुवात झाली. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
संमेलनाचे अध्यक्ष महामंत्री भारतानंद म्हणाले, या देशात हिंदूंचा सन्मान झाला पाहिजे. आमच्या साधू-संतांनी देश, राष्ट्रभक्तीसाठी आपले जीवन समर्पित केले असून, ते मानवतावादी काम करीत आहेत. ते कधीही देशाच्या विरोधात बोलत नाहीत. ते सर्व सनातनी हिंदुत्वाचे काम करत असूनही त्यांच्यावर गुन्हे का दाखल होतात? अन् जे देशाच्या विरोधात नारे देतात त्यांच्याविरोधात काही केले जात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
संमेलनास बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा
या संमेलनासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाचे जवान, दंगा नियंत्रण पथक आदींचा समावेश होता. यावेळी पोलिसांच्या विविध प्रकारच्या वाहनांनी रस्ता भरून गेला होता. दरम्यान बंदोबस्तासाठी पोलीसांनी १४ लाखांचे बिल आकारण्याचा आरोप आयोजकांनी केला.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे साध्वी प्रज्ञासिंह अनुपस्थित
या संत संमेलनाला साध्वी प्रज्ञासिंह या येणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष त्यांच्या मालेगावातील संमेलनाकडे लागले होते. त्यांच्या नावामुळेच हे संमेलन वादाच्या भोवऱ्यातही सापडले होते. मात्र प्रकृती बरी नसल्याने त्या या संमलेनास उपस्थित राहू शकल्या नाहीत. मात्र त्यांनी मोबाइल ऑडिओच्या माध्यमातून संमेलनात संवाद साधला.