वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:11 IST2021-06-01T04:11:41+5:302021-06-01T04:11:41+5:30
नाशिक : वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी शहरातील चारही वृत्तपत्र विक्रेता संघटनांच्यावतीने ...

वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करा
नाशिक : वृत्तपत्र विक्रेत्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करण्यात यावे अशी मागणी शहरातील चारही वृत्तपत्र विक्रेता संघटनांच्यावतीने पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांविषयी राज्य सरकारकडे पाठपुरवठा करीत आहे. मार्च २०२०पासून कोरोना महामारीचे संकट आले. या संकटात सुद्धा वृत्तपत्र विक्रेते आपले काम करीत आहेत. कोरोनाने अनेक वृत्तपत्र विक्रेत्यांचे निधन झाले. असंख्य बाधित झाले तरी ही वर्तमानपत्र वितरणाची सेवा थांबली नाही.त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना महत्त्वाचा घटक म्हणून फ्रंटलाईन वर्कर म्हणून जाहीर करून त्यांना विविध मागण्यांचा लाभ मिळावा अशा आशयाचे निवेदन पालकमंत्री भुजबळ यांना देण्यात आले .
निवेदनात, कोरोनाने निधन झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना २५ लाखांची मदत मिळावी. बाधित झालेल्या वृत्तपत्र विक्रेत्यांना तातडीने दोन लाख रुपयांची मदत मिळावी. राज्यातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांचे तातडीने लसीकरण करावे. वृत्तपत्र विक्रेत्यांची असंघटित कामगार म्हणून नोंदणी सुरू करावी. आरोग्य, शैक्षणिक व पेन्शन आदी योजना लागू कराव्यात. कोरोना उपचारासाठी कॅशलेस मेडिक्लेम किंवा आर्थिक मदत मिळावी अशा मागण्यांचे निवेदन भुजबळ यांना देण्यात आले.
याप्रसंगी माजी नगरसेवक शैलेश ढगे यांनी महाराष्ट्रातील सर्व वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मागण्यांचा विचार करून भुजबळ यांची भेट घडवून दिली. याप्रसंगी निवेदन देताना नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पवार, नवीन नाशिक सिडको वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी ठाकरे, नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष महेश कुलथे ,सातपूर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष विनोद कोर तसेच नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेचे सरचिटणीस भारत माळवे , सिडको वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष अजय बागुल, नाशिक शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर धात्रक तसेच सामाजिक कार्यकर्ते आदित्य धीवर हे उपस्थित होते.
===Photopath===
310521\31nsk_52_31052021_13.jpg
===Caption===
पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देतांना वृ्तपत्र विक्रेता संघटनांचे पदाधिकारी