विलंबाने का होईना अखेर यादी जाहीर

By Admin | Updated: July 7, 2014 00:21 IST2014-07-06T00:31:51+5:302014-07-07T00:21:10+5:30

पोलीस भरती : दोन दिवसांपासून होती प्रतीक्षा

Declaration finally released list | विलंबाने का होईना अखेर यादी जाहीर

विलंबाने का होईना अखेर यादी जाहीर

 

नरेश हाळणोर

नाशिक
नाशिक शहर पोलीस भरतीची अंतिम निवड यादी आजअखेर जाहीर झाली असली तरी त्यासाठी उमेदवारांना गेल्या दोन दिवसांपासून हेलपाटे मारावे लागले. जाहीर केलेल्या वेळेपेक्षा तब्बल साडेतीन तासांनी यादी फलकावर लावण्यात आली तर संकेतस्थळावर रात्री उशिरापर्यंत यादी टाकण्यात न आल्याने परगावचे उमेदवार हैराण झाले होते.
नाशिक शहर पोलीस आयुक्तालयासाठी गेल्या ६ जूनपासून भरतीप्रक्रियेला प्रारंभ झाला खरा; परंतु ढिसाळ नियोजन आणि कार्यपद्धतीतील गलथानपणामुळे अनेक त्रुटी निघाल्या. १०० ऐवजी ८० मीटरचा चुकलेला धावण्याचा ट्रॅक, लेखी परीक्षेसाठी तब्बल सात तासांचा विलंब यासह अनेक कारणांनी सदरची भरती प्रक्रिया चर्चेचा विषय ठरली. इतके होऊनही गेल्या दोन दिवसांपासून भरती प्रक्रियेतील अंतिम निवड यादी जाहीर करण्याच्या तारखा व वेळा संकेतस्थळावर दिल्यानंतरही त्याचे पालन झाले नाही. यापूर्वी गेल्या गुरुवारी (दि. ३) दुपारी १२ वाजता अंतिम यादी जाहीर करणार असल्याचे संकेतस्थळावर सूचना देण्यात आली असता यादी लागलीच नाही. उलट भरतीप्रक्रियेचे संबंधित अधिकारीच बाहेरगावी असल्याचे कारण देत सदरची यादी शुक्रवारी ४ वाजता जाहीर होण्याची सूचना दिली गेली. तसेही झाले नाही, तर शुद्धीपत्रक टाकण्यात आले. ज्यामध्ये एका चुकलेल्या पर्यायाची आणि त्यामुळे दोन उमेदवारांची गुणांची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारांना मानसिक त्रासच सहन करावा लागला. अनेकांनी तर मध्यवर्ती बसस्थानकातच गेल्या दोन दिवसांपासून ठाण मांडून होते.
दरम्यान, आज सायंकाळी ४ वाजता अंतिम यादी जाहीर होणार असल्याने उमेदवारांनी कवायत मैदानाबाहेर गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजेपर्यंत यादी फलकावर लावण्यात आली नाही. पोलिसांकडून यादीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात होते. रात्री साडेसातच्या सुमारास अंतिम यादी फलकावर लावण्यात आली. सदरची यादी पाहण्यासाठी उमेदवारांची एकच गर्दी झाली. यात ज्यांची नावे होती त्यांचे चेहरे खुलले तर ज्यांची नावे नव्हती ते मात्र हिरमुसले.
बाहेरगावहून आलेल्या काहींचा तर मध्यवर्ती बसस्थानकातच मुक्काम होता. दोन दिवसांपासून यादी लागणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगितले जात होते. आज रात्री साडेसातच्या सुमारास यादी जाहीर झाल्यानंतर ती पाहण्यासाठी उमेदवार, त्यांच्या नातलगांची एकच गर्दी झाली होती. रात्रीचा अंधार अन् अंधुक दिव्याच्या प्रकाशात यादी पाहण्यासही उमेदवारांना कष्ट घ्यावे लागत होते.

Web Title: Declaration finally released list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.