एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो : डॉ. मनोज दुराईराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2017 23:29 IST2017-09-10T23:29:33+5:302017-09-10T23:29:55+5:30
नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो

एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो : डॉ. मनोज दुराईराज
नाशिक : अवयवदान चळवळ महाराष्टÑात नक्कीच यशस्वी होऊ शकते, त्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न सुरू झाले असून, हे शुभवर्तमान आहे; मात्र नागरिकांनी जागरूकता दाखवून ‘निर्णय’ घेत सामाजिक बांधिलकी दाखवावी. कारण समाजमनाचा एक निर्णय आठ रुग्णांचा मृत्यूशी असलेला संघर्ष थांबवू शकतो, असे प्रतिपादन पुणे येथील हृदयरोग व अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. मनोज दुराईराज यांनी केले.
अवयवदानाबाबत समाजमनात जनजागृतीसाठी विविध शहरांमध्ये जाऊन व्याख्यान देत दुराईराज यांनी प्रबोधनपर उपक्रम हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात त्यांनी रविवारी (दि.१०) पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले, नाशिक जिल्ह्यातून अवयवदानासाठी नागरिक पुढे येत असून, त्याचा प्रत्यय पुण्यात अवयव प्रत्यारोपण करताना मागील वर्षी आला.
अवयवदानासाठी जिल्ह्यातून प्रमाण वाढावे, समाजाने मानसिकता बदलून पुढे यावे, यासाठी जनजागृतीद्वारे समज-गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातून प्राथमिक सुविधा रुग्णालयांमधून उपलब्ध करून देण्यासाठी रुग्णालयांची नोंदणी, स्वयंसेवी संस्थांना जोडून त्यांच्यामार्फत समाजात अवयवदान चळवळीविषयी जनजागृतीपर मेळावे, शिबिर घेण्याचा मानस असल्याचे ते म्हणाले.