श्रीकृष्ण मंदिरावरून वाद

By Admin | Updated: October 23, 2016 22:56 IST2016-10-23T22:55:49+5:302016-10-23T22:56:26+5:30

वणी : तंटामुक्त समितीचा विषय ग्रामसभेत

Debate on Sri Krishna's temple | श्रीकृष्ण मंदिरावरून वाद

श्रीकृष्ण मंदिरावरून वाद

वणी : तंटामुक्त समितीच्या उपाध्यक्षांनी भगवती कॉलनीतील श्रीकृष्ण मंदिर पाडण्याचा इशारा ग्रामसभेत दिला असून, तशा आशयाची नोंद ठरावात करण्यात आली आहे. वणी येथे भगवती कॉलनीतील महिला वर्गाने लोकवर्गणीतून सुमारे तीन वर्षांपूर्वी श्रीकृष्ण मंदिर बांधले आहे. भावभक्तीपूर्ण वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा विधिवत पार पडल्यानंतर प्रतिदिन नित्यनेमाने पूजाविधी व विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कॉलनीत मंगलमय वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, मंदिरालगत मुलांचे वसतिगृह असून, मंदिर परिसरातील सार्वजनिक टाकीतील पाण्याचा वापर वसतिगृहातील विद्यार्थी करतात. धुतलेले कपडे मंदिराच्या तार कंपाउंडवर वाळत टाकणे तसेच जेवणाचे ताट धुणे यामुळे परिसरात दुर्गंधी पसरून मंदिराची स्वच्छता व पावित्र्य यावर प्रतिकूल परिणाम होतो, अशी श्रीकृष्ण व्यवस्थापन समितीची भूमिका, तर विद्यार्थ्यांना पाणी वापरास प्रतिबंध करण्यात येतो हा वसतिगृहाचा मुद्दा. दरम्यान, आपसातील वाद सामंजस्याने मिटविणे अपेक्षित होते. सदरची घटना घडल्यानंतर ग्रामपालिकेने हा ठराव प्रत देणेबाबत आढेवेढे घेतले. जागृत नागरिकांनी पाठपुरावा केल्यानंतर वास्तव माहितीची ठरावाची प्रत देण्यात आली. सतीश दिलीप जाधव यांच्यावर वणी पोलीस ठाण्याच्या कामकाजात अडथळा आणल्या-प्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच नोंदणीकृत संस्थेचा क्रमांक वापरून बेकायदेशीर वस्तू विक्र ी वाढ़ योजना चालविल्याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. (वार्ताहर)
ग्रामसभेच्या ठरावावर उल्लेख
तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष सतीश दिलीप जाधव यांनी ग्रामसभेत हा विषय नेला. सदरच्या बाबीवर चर्चा सुरू झाली. त्यात सतीश जाधव व श्रीकृष्ण व्यवस्थापन समितीच्या सदस्य यांच्यात या मुद्द्यावरून शाब्दिक चकमक उडाली. दरम्यान, व्यवस्थापन समितीने याबाबत सुधारणा केली नाही तर आम्ही भगवती कॉलनी येथील श्रीकृष्ण मंदिरच पाडून टाकू, असे धक्कादायक व प्रक्षोभक विधान केले. या मुद्द्यावरून गदारोळ झाला. विशेष बाब म्हणजे, ग्रामसभेच्या ठरावावर स्पष्टपणे तसा उल्लेख ग्रामविकास अधिकारी जी. आर. आढाव यांच्या स्वाक्षरीनिशी आहे.

Web Title: Debate on Sri Krishna's temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.