उम्रद येथील युवकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू
By Admin | Updated: July 16, 2016 00:48 IST2016-07-16T00:47:27+5:302016-07-16T00:48:25+5:30
उम्रद येथील युवकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू

उम्रद येथील युवकाचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू
पेठ : तालुक्यातील उम्रद येथील दमणगंगा नदीपात्रात पुरात वाहून गेल्याने एका तीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.
उम्रद येथील सदू पांडू भुसारे (३०) हा पेठ येथून बाजार करून घराकडे जात असताना दमणगंगा नदीवरील पुलावरून पाण्यातून वाट काढत असताना पुलाचे कठडे पुरामूळे वाहून गेल्याने अंदाज न आल्याने पाय घसरून पुरात वाहून गेला. सायंकाळपर्यंत सदू घरी न आल्याने नातेवाइकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्याचा रात्रभर कोठेही तपास लागला नाही. दुसऱ्या दिवशी नजीकच्या बोंडारमाळ गावाजवळ नदीकाठी भुसारे याचा मृतदेह ग्रामस्थांना आढळून आला. पेठ पोलिसांना खबर दिल्याने पोलीस निरीक्षक विजय सोनवणे यांनी पोलीस ताफ्यासह घटनास्थळी भेट देऊन मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला. पेठच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. उम्रद येथील स्मशानभूमीत सदू भुसारे यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
उम्रद ते बोंडारमाळ या दोन गावांना जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरच्या पुलाचे संरक्षक कठडे पहिल्याच पुरात वाहून गेल्याने या पुलावरून पावसाळ्यात पुराचे पाणी वाहत असल्याने नागरिकांना जीव धोक्यात घालूनच ये जा करावी लागत असल्याने संबंधित विभागाने या पुलाची तत्काळ दुरु स्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)