‘सेल्फी’च्या नादात वालदेवी धरणात बुडून दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: February 14, 2016 00:02 IST2016-02-13T23:58:44+5:302016-02-14T00:02:42+5:30
निरोप समारंभ : सिडकोच्या वावरे महाविद्यालयातील बारावीचे विद्यार्थी

‘सेल्फी’च्या नादात वालदेवी धरणात बुडून दोघांचा मृत्यू
नाशिक/ घोटी : महाविद्यालयातील निरोप समारंभानंतर मित्रांसमवेत वालदेवी धरणावर फिरण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा सेल्फीच्या नादात धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि़१३) दुपारच्या सुमारास घडली़ मूळचा इगतपुरी तालुक्यातील आहुर्लीचा रहिवासी अजिंक्य भाऊसाहेब गायकर (१८, सध्या रा. उपेंद्रनगर, सिडको) व देवराम ऊर्फ सौरभ जगन्नाथ चुळभरे (१८, शालिनीताई बोरसे शाळेजवळ, उत्तमनगर, सिडको) अशी बुडून मरण पावलेल्या युवकांची नावे असून, या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़
वाडीवऱ्हे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडकोतील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या स्व़ शांतारामबापू वावरे महाविद्यालयात शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ होता़ या कार्यक्रमानंतर गायकर, चुळभरे हे आपल्या दहा मित्रांसमवेत वालदेवी धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते़ वालदेवी धरणाच्या प्रवेशद्वाराजवळच दुपारी अडीच वाजेच्या सुमारास चुळभरे हा धरणाजवळील एका दगडावर उभा राहून सेल्फी काढत असताना तोल जाऊन पाण्यात पडला़ यावेळी शेजारीच उभ्या असलेल्या गायकरने त्यास वाचविण्यासाठी उडी घेतली. मात्र, हे दोघेही पाण्यात बुडाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला़ अजिंक्य गायकर हे एकूलता एक मुलगा होता.
या घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोहर पाटील, हवालदार युवराज अहिरे, मुळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक युवकाच्या मदतीने या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली़ सायंकाळच्या सुमारास या दोघांचेही मृतदेह सापडल्यानंतर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले़ वालदेवी धरणात बुडालेले हे दोघेही बारावीच्या वाणिज्य शाखेचे विद्यार्थी होते़ या घटनेमुळे सिडको तसेच आहुर्लीमध्ये शोककळा पसरली आहे़ (प्रतिनिधी)