नाशिक : आपल्या आत्याकडे दुगावमध्ये काही दिवसांपूर्वी मुलीसह आलेल्या एका विवाहितेचा सोमवारी (दि.२५) पहाटेच्या सुमारास येथील शेतातील एका विहिरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शीला संतोष पवार (२५, रा. नवे धागूर, ता. दिंडोरी) असे मयत झालेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शीला पवार या मानसिकदृष्ट्या आजारी होत्या. त्या मागील वर्षभरापासून नवे धागूर गावात माहेरीच आपल्या मुलीसोबत वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वी गिरणारेरोडवरील दुगावमध्ये त्या त्यांच्या आत्याकडे आल्या असता पहाटे नैसर्गिक विधीसाठी त्या घराबाहेर पडल्या. यावेळी त्या सकाळी उशिरापर्यंत घरी परतल्या नाही. यामुळे घरच्या लोकांनी शोध घेतला असता त्या विहिरीत पडल्याचे आढळून आले. माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करून त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात हलविला. त्यांच्या मृत्यूमागील निश्चित कारण समजू शकलेले नाही, याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
विहिरीत बुडून विवाहितेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2021 02:44 IST