नांदूरमधमेश्वर कालव्यात बिबट्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 17:13 IST2019-06-30T17:13:14+5:302019-06-30T17:13:49+5:30
सिन्नर : तालुक्यातील मेंढी - सोमठाणे हद्दीलगत असलेल्या नांदूरमधमेश्वर उजवा कालव्याच्या मोरीखाली मृत बिबट्या (मादी) आढळून आल्याचे शनिवारी (दि.२९) रोजी दुपारच्या सुमारास परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.

नांदूरमधमेश्वर कालव्यात बिबट्याचा मृत्यू
पावसाच्या पाण्यात वाहून आलेल्या व काट्यांमध्ये अडकलेल्या क्लजवायरचा कमरेभोवती फास बसून, त्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करताना फास अधिकाधिक आवळला गेला. कंबर, पोट व अवयव कापल्याने रक्तस्त्राव होऊन या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती वनविभाग व पशूसंवर्धन अधिकाऱ्यांनी दिली. कॅनॉललगत दशरथ व संजय गिते यांचे सामाईक क्षेत्र आहे. शेळ्या चारत असताना हा प्रकार एका शेतकºयाच्या निदर्शनास आला. त्याने वनविभागाला माहिती दिल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी प्रविण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल अनिल साळवे, टी. एल. थोरात, मधुकर शिंदे, रोहीत लोणारे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अंदाजे तीन वर्षे वयाची ही मादी होती. पशूसंवर्धन अधिकारी डॉ. मिलिंद भणगे यांनी उत्तरीय तपासणी केल्यानंतर माळेगाव-मोहदरी वनउद्यानात मृत बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.