वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
By Admin | Updated: February 16, 2016 23:05 IST2016-02-16T22:46:07+5:302016-02-16T23:05:37+5:30
वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील घटना

वाहनाच्या धडकेत हरणाचा मृत्यू
सिन्नर : सिन्नर - शिर्डी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरणाचा मृत्यू झाल्याची घटना वावी शिवारात रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली.
वावी ते पांगरी गावादरम्यान ग्रामपंचायत सदस्य इलाहीबक्ष शेख यांच्या शेताजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हरीण रस्त्यावर पडल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते इक्बाल आत्तार यांना मिळाली होती. आत्तार यांनी वावी पोलीस ठाण्यात सदर माहिती दिल्यानंतर हवालदार एस. व्ही. शिंदे, रामदास धुमाळ, अतुल फलके यांनी घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेल्या हरणाला बाजूला केले. आत्तार यांच्या वाहनातून मृत हरीण वावी पोलीस ठाण्याच्या आवारात आणण्यात आले.
याबाबतची माहिती वन विभागाला दिल्यानंतर वनरक्षक के.आर. इरकर, एस.एम. गायकवाड, वनरक्षक डी. एल. इघे, वसंत आव्हाड, बालम शेख यांनी वावी येथे जाऊन मृत हरीण ताब्यात घेतले. नाशिक पश्चिम विभागाच्या उपवन संरक्षक अनिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी एम.एन. बोडके यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी नांदूरशिंगोटे येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत हरणाचे शवविच्छेदन केले. (वार्ताहर)