ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू
By Admin | Updated: July 30, 2016 00:24 IST2016-07-30T00:23:31+5:302016-07-30T00:24:01+5:30
पवारवाडी येथील घटना : अपघातानंतर तणाव

ट्रकच्या धडकेने युवकाचा जागीच मृत्यू
नाशिकरोड : रेल्वे मालधक्का येथून जियाउद्दीन डेपोमार्गे सुभाषरोडला येणाऱ्या ट्रकने दुचाकीस्वारास पाठीमागून धडक दिल्याने रमाबाई आंबेडकरनगर येथील युवक धीरज सुधाकर चंद्रमोरे (३०) हा जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रमाबाई आंबेडकरनगरमध्ये राहणारा किराणा दुकानदार धीरज सुधाकर चंद्रमोरे (वय ३०) हा दुपारी एकच्या सुमारास हिरोहोंडा (एमएच १५ सीयू ७५२१)वरून जियाउद्दीन डेपोमार्गे सुभाषरोडकडे जात होता. पवारवाडी रेल्वे कॉलनी प्रवेशद्वारासमोर पाठीमागून आलेल्या सीमेंटच्या गोण्या घेऊन जाणाऱ्या दहाचाकी ट्रकने (एमएच १५ एजी ५९७३) दुचाकीस पाठीमागून धडक दिल्याने धीरज हा खाली पडून ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडून जागीच ठार झाला. अपघात इतका भयंकर होता की अपघात बघणारेही सुन्न झाले होते.
सुभाषरोड येथून मालधक्का येथे जाणाऱ्या दाट लोकवस्तीतील रस्त्यावरून अवजड वाहनास बंदी असतानादेखील या मार्गावरून सर्रास धोकादायक अवजड वाहतूक सुरूच आहे. याच मार्गावर धीरज यास आपला जीव गमवावा लागला.सदर अपघातानंतर संतप्त नागरिक आक्रमक झाल्याने काहीकाळ तणावाचे वातावरण पसरले होते. अपघातानंतर परिसरातील रहिवासी व मयत धीरजचे नातेवाईक घटनास्थळी जमल्याने मोठा जमाव जमला होता. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे. मयत धीरज याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक वर्षाची मुलगी, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)