पोहण्यासाठी गेलेल्या धनलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकाचा मृत्यू
By Admin | Updated: August 27, 2016 00:08 IST2016-08-27T00:08:07+5:302016-08-27T00:08:31+5:30
पोहण्यासाठी गेलेल्या धनलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकाचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या धनलक्ष्मी पतसंस्थेच्या संचालकाचा मृत्यू
नायगाव : पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या नायगाव येथील धनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक जगन गणपत सानप (४१) यांचा जायगाव येथील बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.
नायगाव येथील रहिवासी व धनलक्ष्मी पतसंस्थेचे संचालक जगन सानप हे गेल्या पंधरा दिवसांपासून पोहणे शिकण्यासाठी जायगाव येथील भैरवनाथ मंदिराजवळील बंधाऱ्यात जात होते. शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सानप दुचाकी घेवून एकटे बंधाऱ्याकडे गेले होते. अंगातील कपडे त्यांनी दुचाकीला अडकवून ठेवले होते. टॉवेल बंधाऱ्यातील पाण्याच्या कडेला ठेवून ते पोहण्यासाठी आत उतरले होते. पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याचा अंदाज आहे.
सायंकाळी उशीर झाला तरी सानप घरी न परतल्याने घरच्या व्यक्तींची त्यांचा शोध घेण्यास प्रारंभ केला. बंधाऱ्याजवळ त्यांची दुचाकी व कपडे दिसून आले. त्यामुळे संशय आला. नायगाव येथून पोहणाऱ्या युवकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. युवकांनी बंधाऱ्यात शोध घेण्यास प्रारंभ केला. शोधकार्य सुरु असतांना नायगाव व जायगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास सानप यांचा मृतदेह आढळून आला.
मृतदेह बंधाऱ्यातून काढून शवविच्छेदनासाठी सिन्नर पालिका रुग्णालयात पाठविण्यात आला. मयत सानप यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. (वार्ताहर)