देवगावी सर्पदंशाने बालिकेचा मृत्यू
By Admin | Updated: November 8, 2015 00:06 IST2015-11-08T00:01:36+5:302015-11-08T00:06:33+5:30
कारवाईची मागणी : आरोग्य केंद्रात उपचार न झाल्याचा आरोप

देवगावी सर्पदंशाने बालिकेचा मृत्यू
देवगाव : येथे शुक्रवारी (दि. ६) एका लहान मुलीला खेळत असताना सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला. येथील गौरी भाऊसाहेब जाधव ( ५) हिला खेळताना सर्पदंश झाल्याने तिच्या आईने तिला येथील अरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. परंतु येथे तिच्यावर साधे प्रथमोपचारही झाले नाही. त्यामुळे गौरीचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर कारवाईची मागणी करत व ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन केले.
वैद्यकीय आधिकारी डॉ. निंबेकर येथे उपस्थित नसल्याने येथील कर्मचाऱ्यांनी तिला निफाड येथे जाण्यास सुचवले. कर्मचाऱ्यांना विनंती करूनही त्यांनी गौरीवर कोणतेही प्राथमिक उपचार केले नाही. तसेच आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकाही उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर मुलीच्या आईने येथील माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे यांचे घर गाठून त्यांच्याकडे मदत मागून त्यांच्या मदतीने आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेतून निफाड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. येथील डॉक्टरांनी गौरीवर उपचार केले; परंतु प्रकृती खालावल्याने गौरीला पुढील उपचारासाठी नाशिकला नेत असताना तिची प्राणज्योत मालवली. आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा न दाखवता वेळेवर प्रथमोपचार केले असते तर गौरीचे प्राण वाचले असते. याप्रसंगी गौरीच्या उपचारासाठी झालेली परवड ऐकून उपस्थितांनांही गहिवरून आले
होते.
अशा संतप्त भावना तिच्या नातेवाइकांनी व्यक्त करत आरोग्य केंद्रातील दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करत जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही तोपर्यंत गौरीच्या नातेवाइकांनी तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. शनिवारी दुपारी हजारो ग्रामस्थांसह भाऊसाहेब बोचरे लहानू मेमाने, भागवत बोचरे यांच्या नेतृत्त्वात ठिय्या आंदोलन केले.
दरम्यान, या घटनेची माहिती आमदार छगन भुजबळ यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना दिली असता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाघचौरे, अतिरिक्त आरोग्य जिल्हाधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, गटविकास अधिकारी भुसारे, नैताळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश चौधरी, लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. आर. सानप यांनी येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन घेतल्यानंतर गौरीचा मृतदेह निफाड येथून ताब्यात घेण्यात आला व दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
देवगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत परिसरातील १७ गावांचे कार्यक्षेत्र असून, येथे दोन वैद्यकीय अधिकारी आहे. मात्र सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा
रिक्त असल्याने येथे एकच
महिला वैद्यकीय अधिकारी काम पाहत असून, औषधे व सर्व सुविधा उपलब्ध असूनही वेळेवर कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने अनेक निर्दोष नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो आहे. (वार्ताहर)