नळवाडी शिवारात आढळला मृत बिबट्या
By Admin | Updated: August 6, 2014 02:00 IST2014-08-05T22:48:12+5:302014-08-06T02:00:25+5:30
नळवाडी शिवारात आढळला मृत बिबट्या

नळवाडी शिवारात आढळला मृत बिबट्या
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नळवाडी शिवारात सुमारे पाच वर्षे वयाचा बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सदर बिबट्याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नळवाडी शिवारातील जगन्नाथ दराडे यांच्या शेताजवळील नागजीरा ओढ्यात मृतावस्थेत बिबट्या शेळ्या चारणाऱ्या शेतकऱ्यांनी मंगळवारी पाहिला. त्यांनी सदरची माहिती सरपंच प्रकाश सहाणे यांना दिली. सहाणे यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्यांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना सदरची माहिती कळविली.
सिन्नर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी टी. एल. बिन्नर, वनपाल एस. एम. गायकवाड, वनरक्षक पी. ए. सरोदे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी नळवाडी शिवारात येऊन पंचनामा केला. दोडी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. डी. ए. शेंगाळ यांनी शवविच्छेदन केल्यानंतर सदर बिबट्याचा मृत्यू निमोनियामुळे झाल्याचे सांगितले. बिबट्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा नसल्याची माहिती बिन्नर यांनी दिली.
दरम्यान, नळवाडी शिवारातील जुनूनवाडी रस्त्यालगत गेल्या आठवड्यात दोन बिबट्यांनी शेतकऱ्यांना दर्शन दिले होते. तेव्हापासून या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. (वार्ताहर)