सिन्नरच्या कचरा डेपोत आढळले मृत स्त्री अर्भक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:11 IST2021-06-21T04:11:05+5:302021-06-21T04:11:05+5:30
ज्या ट्रॅक्टरच्या कचऱ्यात हे अर्भक सापडले, ती गाडी ज्या मार्गावरील कचरा गोळा करते तेथे पाच ते सहा दवाखाने ...

सिन्नरच्या कचरा डेपोत आढळले मृत स्त्री अर्भक
ज्या ट्रॅक्टरच्या कचऱ्यात हे अर्भक सापडले, ती गाडी ज्या मार्गावरील कचरा गोळा करते तेथे पाच ते सहा दवाखाने आहेत. त्यामुळे एखाद्या निष्ठुर मातेने किंवा कुठल्यातरी दवाखान्यातून या अर्भकाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला असावा, असा संशय वर्तवला जात आहे. त्या दिशेने पोलिसांकडून तपास हाती घेण्यात आला आहे. नगरपालिकेच्या डेपोवर गाडी खाली होताच तेथे मजुरांकडून कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. शनिवारी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टरची घंटागाडी खाली झाल्यानंतर त्यातील कचरा वेगवेगळा करत असताना एका प्लॅस्टिकच्या गाठोड्यात काही मजुरांना अंदाजे एक ते दोन दिवसाचे स्त्री जातीचे मृत अर्भक आढळून आले. त्यांनी लागलीच नगरपालिकेला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर आरोग्य निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी याबाबत सिन्नर पोलिसांत फिर्याद दिली.
दरम्यान, ज्या ट्रॅक्टरच्या घंटागाडीत हे अर्भक आढळून आले, ती गाडी भैरवनाथ मंदिर, जनता शाळा वंजार गल्ली, मारुती मंदिर, शेळके गल्ली, नवजीवन डे स्कूलसमोरील परिसर, शिवाजीनगर या भागात कचरा गोळा करते. त्यामुळे हे अर्भक एखाद्या निष्ठुर मातेने घरातील कचऱ्यातून घंटागाडीत टाकले की या मार्गावर असलेल्या एखाद्या रुग्णालयातील कचऱ्यातून ते घंटागाडीत पोहोचविण्यात आले, याबाबत सिन्नर पोलीस तपास करीत आहे. याप्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास धुमाळ, हवालदार राहुल निरगुडे करीत आहेत.