पाइपलाइनमधील मृत बोकड सभेत गाजला

By Admin | Updated: December 1, 2015 22:58 IST2015-12-01T22:53:34+5:302015-12-01T22:58:17+5:30

जलसंधारण समिती बैठक : उपअभियंत्यांची रजा ‘अनधिकृत’

Dead buck go out in the pipeline | पाइपलाइनमधील मृत बोकड सभेत गाजला

पाइपलाइनमधील मृत बोकड सभेत गाजला

नाशिक : देवळा ९ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतील पाइपलाइनमध्ये आढळून आलेला मृत बोकड जिल्हा परिषदेच्या जलसंधारण समितीच्या बैठकीत गाजला. स्थायी समितीच्या बैठकीतही याबाबत चर्चा झाली.
जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन आणि जलसंधारण समितीची मासिक बैठक (दि.१) रावसाहेब थोरात सभागृहात झाली. बैठकीस अध्यक्ष विजयश्री चुंबळे, उपाध्यक्ष प्रकाश वडजे, सभापती किरण थोरे, उषा बच्छाव, शोभा डोखळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड तसेच पाणीपुरवठा लघुपाटबंधारे विभागाचे खातेप्रमुख उपस्थित होते. बैठकीत संगीता ढगे यांनी दिंडोरी तालुक्यातील तीन बंधाऱ्यांच्या कामांना प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव ठेवल्याबाबत चर्चा केली. त्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. राजेश नवाळे यांनी मनेगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरवस्थेबाबत विचारणा करीत या योजनेवर लाखो रुपये खर्च होऊनही ग्रामस्थांना पिण्यास पाणी उपलब्ध होत नसल्याकडे लक्ष वेधले. सदस्य नितीन पवार यांनी देवळा नऊ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत असलेल्या पाइपलाइनमध्ये मृत बोकड सापडल्याबाबत वृत्तपत्रात माहिती आल्याचे व त्याबाबत नक्की वास्तव परिस्थिती काय असल्याची विचारणा केली. त्यावर या योजनेचे उपअभियंता यांनी या पाइपलाइनमध्ये बोकड नव्हे तर अज्ञात पक्षी मृत आढळून आल्याचे व संपूर्ण पाइपलाइनची स्वच्छता व साफसफाई करण्यात आल्याचे सांगितले. बैठकीत लघुपाटबंधारे विभागाचे व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे बहुतांश उपअभियंता अनुपस्थित असल्याबाबत उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी विचारणा केली. अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी सर्व अनुपस्थित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील गायकवाड यांनी पूर्वपरवानगीशिवाय अनुपस्थित असलेल्या सर्व उपअभियंत्यांची रजा अनधिकृत ठरविण्यात येईल, त्याबाबत शासनाला प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

Web Title: Dead buck go out in the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.