द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन मेळा
By Admin | Updated: April 26, 2016 23:58 IST2016-04-26T23:38:23+5:302016-04-26T23:58:48+5:30
ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय : राजयोग शिबिराचे आयोजन

द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन मेळा
नाशिकरोड : रात्रीनंतर दिवस व दिवसाआधी रात्र असे कालचक्र चालूच राहणार आहे. परिवर्तन हा संसाराचा नियम असून सद्य काळ हा कलियुगाचा आहे. मात्र यापुढे कलियुग जाऊन सत्ययुग निश्चितच येणार आहे. जी दिव्य संस्कृती भारतात होती तिचा उदय पुनश्च होणार असून, याच गोष्टीला समजून घेण्यासाठी द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन आध्यात्मिक मेळा तथा राजयोग शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिक मुख्य सेवा केंद्राच्या संचालिका राजयोगिनी बह्माकुमारी वासंतीदिदी यांनी केले.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाशिकरोड सेवा केंद्रातर्फे जेलरोड सेंट फिलोमीना शाळेसमोर द्वादश ज्योतिर्लिंग दर्शन अध्यात्मिक मेळा तथा राजयोग शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ब्रह्माकुमारी वासंतीदिदी बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी विवेक गायकवाड, डॉ. शब्बीर इंदोरकर, नगरसेवक संभाजी मोरूस्कर, सविता दलवानी, सुनीता ओहोळ, राजयोगिनी ब्रह्माकुमारी पारूदिदी आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी ब्रह्माकुमारी चैतालीदिदी यांनी राजयोग मेडीटेशनद्वारे अलौकिक शांतीची अनुभूती करून दिली.
प्रारंभी स्वागत ब्रह्माकुमारी पुष्पादिदी व ब्रह्माकुमारी ज्योतीदिदी व संस्थेचा परिचय वीणादिदी यांनी करून दिला. सूत्रसंचालन ब्रह्माकुमारी सरलादिदी व आभार ब्रह्माकुमारी गोदावरीदिदी यांनी मानले. सदर शिबिर १ मेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. यावेळी ब्रह्माकुमारी ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय परिवाराचे सदस्य, रहिवासी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)