बाजारपेठ परिसरात मनपा पुरविणार डसबीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 20:39 IST2017-08-22T20:38:17+5:302017-08-22T20:39:46+5:30

बाजारपेठ परिसरात मनपा पुरविणार डसबीन

महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ओला व सुका कचरा वर्गीकरणासाठी शहरात व्यापक स्तरावर प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील नागरिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे आवाहन करतानाच घंटागाडी ठेकेदारांकडून नागरिकांना डसबीन पुरविण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, काही ठेकेदारांनी डसबीनचे वाटपही केले आहे. आता महापालिकेने शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या भागात ओला व सुका कचरा संकलनासाठी हिरव्या व निळ्या डसबीन पुरविण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी पहिल्या टप्प्यात ६०० डसबीन खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. बाजारपेठ परिसरातील व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वर्गीकरण करुनच डसबीनमध्ये टाकण्याच्या सूचना केल्या जाणार आहेत. दरम्यान, आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी बाजारपेठांमधील ठिकाणांची पाहणी करत काही ठिकाणे निश्चित केली.