दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार
By Admin | Updated: November 13, 2016 22:48 IST2016-11-13T22:27:47+5:302016-11-13T22:48:18+5:30
दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार

दारणा सांगवीत बिबट्याच्या हल्ल्यात गोऱ्हा ठार
निफाड : तालुक्यातील दारणासांगवी येथे बिबट्याच्या हल्ल्यात जर्सी गोऱ्हा ठार झाल्याची घटना घडली आहे. दारणासांगवी येथे सुनील कारभारी साळवे हे वस्ती करून राहतात. त्यांच्या घराच्या मागे जनावरे बांधण्यासाठी गोठा आहे. त्यात गाय, बैल, गोऱ्हा अशी जनावरे बांधलेली होती. रविवारी पहाटे या गोठ्याच्या जवळ असलेल्या उसातून बिबट्याने गोठ्यात प्रवेश केला आणि ३ ते ४ वर्ष वयाच्या जर्सी गोऱ्ह्यावर हल्ला करून त्यास उसात ओढून नेले. सकाळी गोऱ्हा गोठ्यात नसल्याचे साळवे यांच्या लक्षात आले. अधिक शोध घेतला असता काही अंतरावर उसात गोऱ्हा मृत अवस्थेत आढळून आला. येवला विभागाचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक विजय लोंढे यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला.
रविवारी ज्या साळवे यांच्या शेतात बिबट्याच्या हल्ल्याची घटना घडली त्या ठिकाणापासून अवघ्या ५०० ते १००० फूट अंतरावर वनविभागाने गेल्या एक महिन्यात चक्क तीन बिबटे पिंजऱ्यात जेरबंद केले आहेत. ८ आॅक्टोबरला पहिला, २० आॅक्टोबरला दुसरा आणि ७ नोव्हेंबरला तिसरा बिबट्या दारणासांगवी येथे पिंजऱ्यात जेरबंद झाले होते. तरीही चौथा बिबट्या अवघ्या सात दिवसांनी म्हणजे १४ नोव्हेंबरला पुन्हा दारणासांगवी परिसरात निघतो आणि छोट्या जनावरांवर हल्ला करतो यावरून बिबट्यांची संख्या या तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशी चर्चा होत आहे. (वार्ताहर)