अध्यक्षपदी दराडे; उपाध्यक्ष सुहास कांदे
By Admin | Updated: June 4, 2015 00:33 IST2015-06-04T00:26:49+5:302015-06-04T00:33:49+5:30
जिल्हा बॅँक : नाट्यमय घडामोडींनंतर बिनविरोध निवड

अध्यक्षपदी दराडे; उपाध्यक्ष सुहास कांदे
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाली. अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर ही बिनविरोध निवड झाली. दराडेंच्या रूपाने बॅँकेवर राष्ट्रवादीचा, तर कांदेंच्या रूपाने सेनेचा झेंडा फडकला आहे.
येथील जिल्हा बॅँकेच्या शरद पवार सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. सकाळीच ११ वाजता कोकाटे-भोसले गटाकडून माणिकराव कोकाटे व खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अध्यक्षपदासाठी फॉर्म भरला. तर हिरे गटाकडून आमदार अनिल कदम यांनी फॉर्म भरला. उपाध्यक्षपदासाठी हिरे गटाकडून अॅड. संदीप गुळवे फॉर्म भरणार होते; मात्र सर्वानुमते सुहास कांदे यांचे नाव पुढे आल्याने गुळवे यांनी फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला. सभागृहात ऐनवेळी नाट्यमय घडामोडी घडत अध्यक्षपदासाठी नरेंद्र दराडे यांनी फॉर्म भरला. त्यानंतर नियोजित माघारीच्या वेळी दराडे वगळता सर्वांनी माघार घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी सुहास कांदे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर लगेचच संचालक केदा अहेर यांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड ही एक वर्षासाठी असल्याचा ठराव मांडला, तर त्यास गणपतराव पाटील यांनी अनुमोेदन दिले. दुसरे संचालक शिवाजी चुंभळे यांनी ही निवड एक वर्षासाठीच करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ माळवे यांनी नवीन घटना दुरुस्तीनुसार ही निवड पाच वर्षांसाठी असून, अध्यक्ष व उपाध्यक्षांना राजीनामा देणे वैयक्तिक असून, नवीन निवडणूक घेण्याचे अधिकार सहकार प्राधिकरणाला असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्षांचे अन्य सर्व संचालकांनी अभिनंदन केले. यावेळी अन्य संचालक आमदार सीमा हिरे, आमदार जे. पी. गावित, माजी आमदार माणिकराव
कोकाटे, दिलीप बनकर, अद्वय हिरे, परवेज कोकणी, नामदेव हलकंदर, डॉ. शोभा बच्छाव, सचिन सावंत, धनंजय पवार, किशोर दराडे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)