डेंग्यूमुळे बालकाचा बळी
By Admin | Updated: October 23, 2014 00:05 IST2014-10-23T00:04:05+5:302014-10-23T00:05:26+5:30
जुने नाशिक : रुग्णसंख्येत वाढ; एकवीस दिवसांत आढळले ६८ रुग्ण

डेंग्यूमुळे बालकाचा बळी
नाशिक : शहरात दिवसेंदिवस डेंग्यूरुग्णांची संख्या वाढत असून, जुन्या नाशकात संशयित डेंग्यूरुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. ऐन सणासुदीच्या दिवसांत रोगराईने डोके वर काढले असून, चालू महिन्यात २१ दिवसांत १४० संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी ६८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
शहरात यंदाच्या पावसाळ्यात डेंग्यूचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. गेल्या महिन्यापर्यंत परिस्थिती आटोक्यात असल्याचा दावा केला जात होता. या महिन्यापर्यंत हीच स्थिती होती; परंतु आता त्यात बदल झाला असून, रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच बुधवारी पहाटे कथडा परिसरातील फैजान असिफ शेख या संशयित डेंग्यूरुग्ण बालकाचा बुधवारी पहाटे शहरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. तो अनेक दिवसांपासून आजारी असल्याने त्याला आधी मविप्रच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तद्नंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथे त्याचा मृत्यू झाला. खासगी प्र्रयोगशाळेत या मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असले, तरी शासकीय प्रयोगशाळेतून अधिकृतरीत्या त्याची पुष्टी झालेली नाही, असे पालिकेच्या वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.
दरम्यान, शहरात रुग्णसंख्या वाढतच असून, गेल्या २१ दिवसांत १४० संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यांचे रक्तनमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेत पाठविल्यानंतर त्यापैकी १२३ अहवाल प्राप्त झाले असून, ६८ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तथापि, यापैकी ५१ रुग्णच पालिकेच्या हद्दीतील असून, उर्वरित रुग्ण बाहेरील असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. दरम्यान, डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)