डांगसौंदाणेत कांदा पाण्यात
By Admin | Updated: July 12, 2016 23:03 IST2016-07-12T22:42:30+5:302016-07-12T23:03:43+5:30
शेतकऱ्यांची दाणादाण : महसूल विभागाकडून परिसरात पंचनामे सुरू

डांगसौंदाणेत कांदा पाण्यात
डांगसौंदाणे : डांगसौंदाणेसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडवून दिली. परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने बळीराजाचे लाखोंचे नुकसान झाले असून, महसूल विभागाकडून सदर नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असल्याची माहिती तलाठी सुरेश सोनवणे यांनी दिली.
डांगसौंदाणेसह परिसरात काल झालेल्या पावसाने बळीराजाची दाणादाण उडवून दिली. १८ ते २० तास सलग कोसळलेल्या पावसाने परिसर जलमय होऊन नद्या, नाले, बांध तुडुंब भरून वाहत होते. या पावसाने शेतकरी बांधवांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. यात किशोर चिंचोरे यांच्या कांदा चाळीत पाणी शिरून १५ ट्रॉली कांदा भिजून लाखोंचे नुकसान झाले. केदा पवार यांचा ५ ते ६ ट्रॉली कांदा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने ३ ते ४ लाखांचे नुकसान झाले. अनंत वाघ यांचाही ५ ते ६ ट्रॉली कांदा चाळीत भिजून मोठे नुकसान झाले, तर नीलकंठ चंद्रात्रे, बाबूराव वाघ, प्रभाकर जगताप, प्रकाश बिरारी यांच्या विहिरीत नाल्याचे पाणी शिरल्यामुळे विहिरी गाळ भरून बुजून गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. पंढरीनाथ बोरसे यांच्या पोल्टी फार्ममध्ये पाणी शिरल्यामुळे ९ हजार पक्ष्यांपैकी ७ हजार पक्षी वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले, तर सुशील सोनवणे यांच्या पोल्टी फार्ममध्ये पाणी शिरल्यामुळे १००० ते १५०० पक्षी मृत पावले. (वार्ताहर)