सिग्नलवर गतिरोधकांचा ‘दणका’
By Admin | Updated: December 27, 2015 00:45 IST2015-12-27T00:23:17+5:302015-12-27T00:45:28+5:30
आदळआपट वाहनांची : अपघातांना निमंत्रण; नागजी-साईनाथनगर चौक धोकेदायक

सिग्नलवर गतिरोधकांचा ‘दणका’
नाशिक : मुंबई नाका-काठेगल्ली, वडाळा-पाथर्डीरोड ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ‘नागजी चौफुली’वर काही दिवसांपूर्वीच सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली; मात्र येथील गतिरोधक अद्याप ‘जैसे-थे’ असल्यामुळे नागरिकांना सिग्नल पाळताना ‘दणका’ सहन करावा लागत आहे. परिणामी अपघातांना निमंत्रण मिळत आहे.नागजी चौकात यापूर्वी वाहतूक बेट होते. वडाळारोडवर इंदिरानगरकडे जाताना तसेच वडाळा नाक्याकडे जाताना त्याचप्रमाणे मुंबई नाका-काठेगल्ली या रस्त्यावरही दोन्ही बाजूने या चौफुलीच्या अलीकडे गतिरोधकही (रम्बलर) पालिकेने टाकले. डांबरी गतिरोधक टाकताना वाहतुकीच्या नियमांचे कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. केवळ वाहनांच्या वेगाला अटकाव व्हावा, म्हणून अवाढव्य एकापाठोपाठ तीन गतिरोधक टाकू न वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या वाहतूक बेटामुळे अरुंद चौकात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. बेट हटवून चौफुलीवर सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली; मात्र ही सिग्नल यंत्रणा अनेक महिने केवळ शोभेपुरतीच होती. तक्रारी वाढल्यानंतर सिग्नलचे ‘दिवे’ लागले. सिग्नलचे पालन बंधनकारक म्हणून वाहनचालकांकडून या चौफुलीवर ‘लाल’ दिवा लागताच वाहनांना ‘ब्रेक’ लावला जाऊ लागला. मात्र गतिरोधकांमुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कारण सिग्नलवर गतिरोधक ओलांडून काही वाहनचालक पुढे दुसऱ्या रस्त्याच्या समोरच थांबतात. अपघातांच्या घटना सातत्याने घडत आहेत. गतिरोधक हटविणे गरजेचे झाले आहे.