घंटागाड्यांचे झाले विदारक दर्शन
By Admin | Updated: September 11, 2015 23:11 IST2015-09-11T23:11:14+5:302015-09-11T23:11:59+5:30
खतप्रकल्पावर गोलमाल : स्थायी समिती सभापतींचा दौरा

घंटागाड्यांचे झाले विदारक दर्शन
नाशिक : सिडकोत गुरुवारी नेहा ठाकरे या दहा वर्षांच्या मुलीचा घंटागाडीखाली चिरडून मृत्युमुखी पडण्याच्या घटनेनंतर स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांनी शुक्रवारी केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांना घंटागाड्यांचे विदारक दर्शन घडले. रस्त्यांवर दोन-तीन ठिकाणी बंद पडलेल्या घंटागाड्या, अनेक गाड्यांची दुरवस्था पाहून सभापतींनी संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, खतप्रकल्पावरही सभापतींना गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये गोलमाल आढळून आल्याने त्यांनी आरोग्याधिकाऱ्यांना धारेवर
धरले.
सिडकोतील घटनेनंतर घंटागाड्यांच्या एकूणच स्थितीबद्दल गुरुवारच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी संबंधित ठेकेदारासह आरोग्य विभागाला दोषी धरले होते. सभापती शिवाजी चुंभळे यांनी या घटनेबद्दल सिडकोतील स्वच्छता निरीक्षक रमेश गाजरे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते याशिवाय आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना शुक्रवारी सर्वच्या सर्व घंटागाड्यांना एकत्र आणून ठेवण्याचे आदेश देत त्यांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, शुक्रवारी दुपारी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह समितीचे सदस्य यशवंत निकुळे, शैलेश ढगे यांनी खतप्रकल्पावर धडक देत तेथे हजर असलेल्या घंटागाड्यांची स्थिती जाणून घेतली. यावेळी घंटागाड्यांची अवस्था पाहून सभापतींनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. खतप्रकल्पावर घंटागाड्यांच्या होणाऱ्या फेऱ्यांबाबतचे रजिस्टरही सभापतींनी तपासले असता एकाच क्रमांकाची गाडी चार तासांच्या अंतराने दोन वेळा फेऱ्या मारत असल्याचा गोलमालपणाही सभापतींच्या निदर्शनास आला. विशेष म्हणजे १७१ घंटागाड्या असताना त्यातील १२७ गाड्याच खतप्रकल्पावर येऊन गेल्याची नोंद आढळून आली, तर ४४ घंटागाड्या आल्याच नसल्याचे लक्षात आले. त्याचबरोबर खतप्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची मशिनरी, वाहने बेवारस स्थितीत गंजलेल्या स्थितीत पडून असल्याचे पाहताच सभापतींनी आरोग्याधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर सभापतींनी कन्नमवार पुलाजवळील महापालिकेच्या डेपोत असलेल्या घंटागाड्यांचीही पाहणी केली असता तेथेही घंटागाड्यांचे विदारक दर्शन घडले. या साऱ्या प्रकाराबाबत खेद व्यक्त करत सभापतींनी संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले.