परीक्षेच्या काळात शांतता धोक्यात
By Admin | Updated: February 25, 2017 23:24 IST2017-02-25T23:23:59+5:302017-02-25T23:24:20+5:30
जेएनयू घोषणाबाजी प्रकरण : अभाविपचा आंदोलनात्मक पवित्रा

परीक्षेच्या काळात शांतता धोक्यात
नाशिक : दिल्लीनंतर पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडिया यांच्या सदस्यांमध्ये मारहाण झाल्यानंतर नाशिकमध्येही अभाविपच्या विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कथित देशविरोधी घोषणाबाजी विरोधात निषेध नोंदविण्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे परीक्षांच्या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालये तथा विद्यापीठांतील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे विद्यापीठात पोस्टर लावण्यावरून दोन्ही संघटनांचे सदस्य एकमेकांशी भिडले. त्यामुळे विद्यापीठाच्या आवारात झालेल्या प्रकाराची नाशिकमध्ये पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐन परीक्षेच्या कालावधीत शहरातील विविध महाविद्यालये तथा विद्यापीठांमधील शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अभाविपने दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून संदेश फिरविले आहे. या संदेशानुसार जेएनयू विद्यापीठ, एआयएसए सारख्या संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी करून विद्यापीठ परिसरात तणाव निर्माण केल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नाशिक जिल्हा शाखेतर्फे करण्यात आला आहे. स्टुडंट काउन्सील, स्टुडंट फेडरेशन व एएसआयएच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीचा या संदेशाच्या माध्यमातून निषेधही करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)