मुंबई नाका ते आडगाव नाक्यापर्यंत धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:58 IST2020-09-05T22:16:39+5:302020-09-06T00:58:27+5:30
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स ...

मुंबई नाका ते आडगाव नाक्यापर्यंत धोका
नाशिक : शहरात प्रवेश करताना मुंबई नाका येथून थेट द्वारकेच्या पुढे स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा मुंबई-आग्रा महामार्ग सुमारे दहा दिवसांपासून बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे. यामुळे समांतर रस्त्यावर दुतर्फा वाहतुकीचा ताण निर्माण होत आहे. पावसाच्या रिपरिपमुळे आणि उड्डाणपुलाच्या गळक्या पाइपलाइन-मधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्याने महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. ठिकठिकाणी रस्ता निसरडा बनल्याने वाहने घसरून अपघातांना निमंत्रण मिळू लागल्याने रस्ता बंद केला गेला; मात्र महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला गती दिली जात नसल्याने वाहनचालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबई नाक्यापासून तर थेट स्वामीनारायण मंदिरापर्यंत ठिकठिकाणी चिखल पसरल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून मुंबई नाका, द्वारका, वडाळा नाका, टाकळी फाटा, जुना आडगाव नाका आदी चौफुल्यांवर बॅरिकेड्स लावून महामार्ग बंद करण्यात आला आहे. द्वारकेवरून आडगावकडे ‘नो एण्ट्री’एकीकडे महामार्ग निसरडा व धोकादायक झाला असताना द्वारका चौकातून आडगावकडे जाण्यासाठी उड्डाणपुलावरदेखील अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. यामुळे अवजड व शहरातील हलकी वाहने समांतर रस्त्यावरून मार्गस्थ होत आहेत. त्यामुळे रस्त्याची चाळण झाली असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत.महामार्ग तत्काळ सुरक्षित करा
शहर वाहतूक शाखेचे अधिकारी व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने या भागाची पाहणी करून स्वच्छतेचे काम मार्गी लावण्याचे आदेश द्यावेत आणि वाहतूक सुरळीत करण्यास हातभार लावावा, अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे. सोमवारी (दि.३१) पावसाने उघडीप दिली होती तसेच दुपारनंतर अधूनमधून सूर्यदर्शनही घडल्याने चिखल कोरडा होण्यास मदत झाली. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने तातडीने मुंबई नाका ते स्वामीनारायण मंदिरापर्यंतचा महामार्ग सुरक्षित करून तो खुला करून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.या मार्गावरील वाहतूक समांतर रस्त्याने वळवण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. गेल्या सोमवारपासून हा रस्ता बंद करण्यात आला असून, अग्निशमन दलाच्या मदतीने
तसेच प्राधिकरणाकडून ठिकठिकाणचा चिखल काढून रस्ता सुरक्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत; मात्र हे काम अत्यंत संथ गतीने होत असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे.